मोदी सरकारने देश विकला : उदयनराजे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2019 10:47 AM2019-04-08T10:47:10+5:302019-04-08T10:48:43+5:30
नोटबंदी आणि इतर निर्णय घेताना विरोधकांना विश्वासात घ्यायला हवे होते. पण तस न करता मोदींनी अचानक देशावर नोटबंदी लादली. त्यामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत.
मुंबई - देशात हुकूमशाही सुरू असल्याचे अनेक कलाकारांनी आणि साहित्यीकांनी याआधीच म्हटले आहे. देश केवळ दोनच लोक चालवतात, असे आरोपही आतापर्यंत अनेकांनी केले आहे. आता छत्रपती शिवाजी महाजारांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी देखील देशात हूकुमशाही असल्याचे म्हटले. तसेच मोदी सरकारने देश विकल्याची घणाघाती टीका उदयनराजे यांनी केली. एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
देशाच्या कल्याणासाठी तुम्ही खुशाल निर्णय घ्या. परंतु, हुकूमशाही नका आणू. एक दिवस एक माणूस संध्याकाळी टीव्हीवर येतो आणि नोटबंदी जाहीर करतो. नोटबंदी आणि इतर निर्णय घेताना विरोधकांना विश्वासात घ्यायला हवे होते. पण तस न करता मोदींनी अचानक देशावर नोटबंदी लादली. त्यामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. अनेकांवर उपासमारीची वेळ आल्याचे उदयनराजे यांनी म्हटले.
देशात नॅचरल गॅसचे, नॅचरल ऑईलचे साठे आहे. मात्र सरकारने हे साठे जवळच्या मित्रांना दिल्याची टीका उदयनराजे यांनी मोदींचे नाव न घेता केली. आज घडीला मोदींच्या मित्रांची संपत्ती देशाच्या बजेटपेक्षा अधिक झाली आहे. या संपत्तीचा उपयोग करून देशातील युवकांना मोफत शिक्षण, मोफत वैद्यकीय सुविधा, मोफत निवारा देता आला असता. परंतु, हे सगळं जवळच्या मित्रांनाच दिल्याचे उदयनराजे यांनी म्हटले. तसेच रशियाप्रमाणे देशाचे तुकडे होऊन नये, अशी आशा उदयनराजे यांनी व्यक्त केली.
मराठा म्हणजे धर्म
राज्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या मराठा मोर्चांचे नेतृत्व उदयनराजेंनी करावे अशी मागणी करण्यात आली होती. यावर उदयनराजे म्हणाले की, मराठा हा एक धर्म आहे. इतरांना आरक्षण आहे, तर मराठा समाजाला देखील मिळावं. मराठा समाजासह धनगरांना आणि मुस्लीमांना देखील आरक्षण मिळावं असंही ते म्हणाले.