राज ठाकरेंचा झंझावात अन् मोदींची बारामतीची सभा लांबणीवर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2019 04:41 PM2019-04-07T16:41:34+5:302019-04-07T17:15:50+5:30
स्त वेळापत्रकामुळे मोदींची सभा लांबणीवर टाकण्यात आल्याचे समजते. मात्र राज यांच्या झंझावाती सभेनंतरच मोदींची सभा लांबणीवर पडल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
मुंबई - २०१४ च्या निवडणुकीत राज ठाकरे यांच्या भूमिकेमुळे भाजपला फायदाच झाला होता. परंतु, यावेळी राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध भूमिका घेतली आहे. तसेच शनिवारी झालेल्या मेळाव्यात राज यांनी मोदींचा कथित खोटेपणा पुराव्यानिशी माध्यमांसमोर मांडला. त्यामुळे मोदींची प्रतिमा महाराष्ट्रात खराब होण्याची शक्यता आहे. त्यातच आता मोदींची बारामती येथे १० एप्रिल रोजी होऊ घातलेली जाहीर सभा लांबवण्यात आली आहे. या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता मोदींची सभा पुढच्या टप्प्यात होण्याची शक्यता आहे.
मनसेच्या मेळाव्यानंतर सध्या माध्यमांमध्ये राज ठाकरे यांच्याच भाषणाची चर्चा सुरू आहे. त्यातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बारामतीमधील जाहीर सभा लांबणीवर टाकण्यात आली आहे. व्यस्त वेळापत्रकामुळे ही सभा लांबणीवर टाकण्यात आल्याचे समजते. मात्र राज यांच्या झंझावाती सभेनंतरच मोदींची सभा लांबणीवर पडल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
पंतप्रधान मोदी प्रत्येक प्रचार सभेत सैन्याचा पराक्रम आणि आम्ही सैन्याला दिलेले अधिकार याविषयी सांगत असतात. राज ठाकरे यांनी हाच धागा पकडून काश्मीरमध्ये मोदींनी दिलेल्या भाषणांची क्लिप सर्वांना ऐकवली. त्यात, आपणच सैनिकांवर कारवाई करण्याचे आदेश दिल्याचे मोदी काश्मीरमधील सभेत सांगताना दिसत होते. त्यामुळे मोदी खोट बोलत असल्याचे स्पष्ट झाले. दुसरी बाब म्हणजे, मोदींच्या बीफ निर्यातीवरील भूमिकेसंदर्भातील क्लिप राज यांनी सर्वांना ऐकवली. त्यामुळे मोदींचा दुटप्पीपणा समोर आल्याचे मनसेच्या वतीने सांगण्यात येत आहे.
दरम्यान राज यांच्या भाषणांचे महाराष्ट्रातील अनेक वृत्तवाहिन्यांनी थेट प्रक्षेपण केले होते. त्यामुळे यांच्याविरोधातील अनेक मुद्दे घराघरात पोहोचले आहे. त्यामुळे मोदी महाराष्ट्रात सभा घेण्यास आल्यास, जनतेकडून राज यांनी उपस्थिती केलेले प्रश्न पुन्हा विचारले जाऊ शकतात, अशी शक्यता आहे. यावर भाजप काय तोडगा काढणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.