गडकरी साहेब, मोदींना कुठल्या चौकात अन् कधी ठोकणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 09:52 PM2019-04-18T21:52:46+5:302019-04-18T21:53:43+5:30
नरेंद्र मोदी यांच्या भाषणावर नितीन गडकरींच्या वक्तव्याचा उल्लेख करत राष्ट्रवादी काँग्रेसने भारतीय जनता पार्टी आणि मोदींना टोला लगावला आहे.
मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अकलूज येथील झालेल्या जाहीर सभेत विरोधकांवर आरोप करत जातीचा उल्लेख केला होता. नरेंद्र मोदी यांच्या भाषणावर नितीन गडकरींच्या वक्तव्याचा उल्लेख करत राष्ट्रवादी काँग्रेसने भारतीय जनता पार्टी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे. नितीन गडकरी यांनी पिंपरीमध्ये केलेल्या भाषणाचा हवाला देत गडकरी साहेब, नरेंद्र मोदी यांनी कुठे, कधी आणि कुठल्या चौकात ठोकून काढणार असं ट्विट केलेलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माढा लोकसभा मतदारसंघात प्रचारासाठी जाहीर सभा घेतली. काही दिवसांपूर्वी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ज्यांचे आडनाव मोदी ते सर्व जण चोर का आहेत असे वक्तव्य केले होते या वक्तव्याचा समाचार घेत पंतप्रधान म्हणाले की, मी खालच्या जातीचा असल्याने अनेकदा माझ्यावर टीका केली. आता तर त्यांनी आणखी पाऊल पुढे टाकले आहे. ते आता एका समाजालाच शिव्या देत आहेत. मला कितीही शिव्या द्या, मी ते सहन करु शकतो. पण देशातील आदिवासी, शोषित आणि मागास वर्गाला चोर म्हटल्यास मी ते सहन करणार नाही असं म्हटलं होतं.
गडकरी साहेब,
— NCP (@NCPspeaks) April 18, 2019
कुठे?
कधी?
कुठल्या चौकात?@abpmajhatvpic.twitter.com/j8SQmeL94q
नरेंद्र मोदी यांच्या या वक्तव्यावरुन सोशल मिडीयामध्ये सध्या एक फोटो व्हायरल होतोय. हाच फोटो ट्विट करत राष्ट्रवादी काँग्रेसने नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. या फोटोमध्ये नितीन गडकरी यांनी फेब्रुवारी महिन्यात केलेल्या भाषणाचा उल्लेख केला आहे. या कार्यक्रमात नितीन गडकरी म्हणाले होते की, जातीयवाद आणि सांप्रदायिकतेपासून मुक्त आर्थिक, सामाजिक समता-एकता याच्या आधारावर संपूर्ण समाजाचे संघटन झाले पाहिजे. मी जात पात मानत नाही. मात्र, आमच्या येथे बंद केली आहे. संपूर्ण समाजाचे संघटन होणे गरजेचे आहे. या समाजात गरीब-श्रीमंत असा भेद असता कामा नये. असं सांगत जो जातीचं नाव काढेल त्यांना मी ठोकून काढेल’ असं वक्तव्य केलं होतं.
नितीन गडकरींचे हे विधान पकडून राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाला चिमटा काढला आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जातीच्या नावावर केलेल्या विधानाचाही राष्ट्रवादी काँग्रेसकडून समाचार घेण्यात आला आहे.