'लिहून घ्या... महाराष्ट्रात मुदतपूर्व निवडणूक होत नाही'- मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2019 03:33 PM2019-03-07T15:33:29+5:302019-03-07T16:07:53+5:30

आज रात्री विधानसभा बरखास्तीचा निर्णय होणार, हे वृत्त निराधार - देवेंद्र फडणवीस

lok sabha election 2019 no mid term election in maharashtra cm devendra fadnavis clarifies | 'लिहून घ्या... महाराष्ट्रात मुदतपूर्व निवडणूक होत नाही'- मुख्यमंत्री

'लिहून घ्या... महाराष्ट्रात मुदतपूर्व निवडणूक होत नाही'- मुख्यमंत्री

Next

नागपूर: महाराष्ट्राची विधानसभा बरखास्त करण्याचा निर्णय आज रात्री घेण्यात येईल आणि लोकसभेसोबतच विधानसभेची निवडणूक होईल, अशी चर्चा आज सकाळपासून राजकीय वर्तुळात सुरू आहे. यावरुन बरेच तर्कवितर्कही लढवले जाताहेत. परंतु, हे वृत्त पूर्णपणे निराधार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठामपणे म्हटलं. महाराष्ट्रात मुदतपूर्व निवडणूक होणार नाही हे लिहून घ्या, अशा शब्दांत त्यांनी या चर्चेवर पडदा पाडण्याचा प्रयत्न केला. लोकसभेसोबत विधानसभेची निवडणूक घेतली जाईल, असे दावे गेल्या काही दिवसांपासून केले जात होते. विरोधी पक्षातील काही नेत्यांनी राज्यात मुदतपूर्व निवडणूक होणार असल्याची विधानं केली होती. 

महाराष्ट्र आणि हरियाणाची विधानसभा बरखास्त करण्याचा निर्णय आज रात्री दिल्लीत होणाऱ्या उच्चस्तरीय समितीकडून घेतला जाईल, अशी जोरदार आज सकाळपासून सुरू होती. त्यामुळे दोन्ही निवडणुका एकत्र होणार का, याबद्दल विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. मात्र ही चर्चा संपूर्णपणे निराधार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्रात मध्यावधी निवडणूक होणार या चर्चेत तथ्य नसल्याचं फडणवीस म्हणाले. 

गेल्या 48 तासांमध्ये घडलेल्या घडामोडींमुळे विधानसभेची निवडणूक लोकसभेसोबतच होणार असल्याच्या चर्चेला उधाण आलं होतं. गेल्या दोन दिवसात राज्याच्या कॅबिनेटनं निर्णयांचा धडाका लावला आहे. फडणवीस सरकारनं अनेक महत्त्वपूर्ण जीआर काढले आहेत. याशिवाय सरकारकडून उद्धाटनं आणि भूमिपूजन कार्यक्रमांचं आयोजनदेखील केलं जात आहे. राज्यात अधिकचे ईव्हीएम आणण्यासाठीदेखील हालचाली सुरू आहेत. याच घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज्यात मुदतपूर्व निवडणूक होणार असल्याची चर्चा सुरू झाली होती.

विशेष म्हणजे विधानसभेचं अधिवेशन सुरू असताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी असाच दावा केला होता. 28 फेब्रुवारीला विधानसभेचं अधिवेशन संपताच मुख्यमंत्री विधानसभा बरखास्त करतील आणि लोकसभेसोबतच विधानसभेच्या निवडणुकादेखील घेतल्या जातील, असं चव्हाण म्हणाले होते. यावेळी त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचनादेखील दिल्या होत्या. त्यावेळीही मुख्यमंत्र्यांनी चव्हाण यांचं विधान चुकीचं असल्याचं म्हटलं होतं. 
 

Web Title: lok sabha election 2019 no mid term election in maharashtra cm devendra fadnavis clarifies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.