नेत्यांनो खबरदार ! प्रचारासाठी आल्यास चोप मिळेल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2019 04:56 PM2019-04-15T16:56:58+5:302019-04-15T17:14:31+5:30
पैठण तालुक्यातील २३ वर्षांपासून रखडलेली ब्रह्मागव्हाण उपसा सिंचन योजना पूर्ण व्हावी म्हणून तालुक्यातील शेतकऱ्यांनी आजपर्यंत ४० पेक्षा अधिक आंदोलने केली आहेत. प्रत्येक निवडणुकीत केंद्रबिंदू म्हणून ब्रम्हागव्हाण उपसा सिंचन योजनाकडे बघितले जाते.
मुंबई - लोकसभा निवडणुकीत सर्वच पक्षाचे नेते आणि उमेदवार खेड्या-पाड्यात जाऊन आपला प्रचार करत आहे. पाच वर्षांत कधीही न पाहिलेले गावात जाऊन मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे. औरंगाबादमधील पैठण तालुक्यातील हर्षी गावात मात्र कोणताही राजकीय नेता जायला तयार नाही, यांचं कारण ही तसच आहे. नेतेमंडळी आले तर चोप दिला जाईल, या गावकऱ्यांच्या भूमिकेमुळे राजकीय पुढारी गावात प्रचार करण्यासाठी इच्छूक नाही.
पैठण तालुक्यातील हर्षी म्हणून असलेल्या गावात आणि गावच्या शिवारात गावकऱ्यांनी होर्डिग लावली आहे. गावात राजकीय नेत्यांना बंदी आहे. गावात जर कुणी मतदान मागायला आले तर चोप दिला जाईल अशा प्रकारचा संदेश होर्डिंगमधून देण्यात आला आहे.
पैठण तालुक्यातील २३ वर्षांपासून रखडलेली ब्रह्मागव्हाण उपसा सिंचन योजना पूर्ण व्हावी म्हणून तालुक्यातील शेतकऱ्यांनी आजपर्यंत ४० पेक्षा अधिक आंदोलने केली आहेत. प्रत्येक निवडणुकीत केंद्रबिंदू म्हणून ब्रम्हागव्हाण उपसा सिंचन योजनाकडे बघितले जाते. पंचायत समिती निवडणुका असो की लोकसभा प्रत्येक वेळी योजना पूर्ण करण्याचे आश्वासन राजकीय पक्षांच्या वतीने दिले जाते. मात्र राजकीय श्रेयवादाचे ग्रहण या योजनेला लागलेले आहे.
सध्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरु आहे. त्यामुळे, सर्वच राजकीय पक्षांचे नेतेमंडळी गावभेठी घेत असून मतदान करण्याचे अवाहन करत आहे. जालना लोकसभा मतदारसंघातील हर्षी या गावातील गावकऱ्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे नेते आणि कार्यकर्ते यांनी धसका घेतला असून गावच्या आसपासच्या परिसरात कोणत्याच पक्षांचे कार्यकर्ते प्रचाराला फिरकत नसल्याने हे गाव चर्चेचा विषय बनला आहे.