मतदान आलं दीड दिवसावर; काय चाललंय तरुणाईच्या मनात? 

By सायली शिर्के | Published: April 27, 2019 05:54 PM2019-04-27T17:54:57+5:302019-04-27T18:01:44+5:30

तरुण मतदारांची मतं ही निर्णायक ठरतील, असं बोललं जातं. त्यामुळे तो या मतदानाकडे कसं पाहतोय, यावर बरंच काही अवलंबून आहे. त्याचाच एक छोटा प्रयत्न आम्ही केलाय... बघा, काय म्हणतेय तरुणाई.

lok sabha election 2019 opinion of young voters in maharashtra | मतदान आलं दीड दिवसावर; काय चाललंय तरुणाईच्या मनात? 

मतदान आलं दीड दिवसावर; काय चाललंय तरुणाईच्या मनात? 

googlenewsNext

महाराष्ट्रात चौथ्या टप्प्यातील मतदान सोमवारी, २९ एप्रिलला होतंय. राज्यात पहिल्या टप्प्यात सात, दुसऱ्या टप्प्यात दहा, तिसऱ्या टप्प्यात १४ मतदारसंघांमध्ये मतदान झालं होतं. आता तब्बल १७ मतदारसंघांमधील नागरिक मतदानाचा हक्क बजावणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून धडाडणाऱ्या प्रचाराच्या तोफा आता थंडावल्यात. प्रत्येक उमेदवाराने प्रतिस्पर्ध्यांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आपल्यालाच मत देण्याचं आवाहन केलं आहे. आपण मतदारसंघासाठी काय-काय करू, याची मोठ्ठी यादीही दिली आहे. स्टार प्रचारकांची, बड्या नेत्यांची मदत घेऊन 'इमेज बिल्डिंग'चा प्रयत्न केलाय. त्यामुळे आता पुढचा दीड दिवस मतदारांचा आहे - आपला आहे.

लोकशाहीत जनतेचं मत अमूल्य आहे. त्यामुळे ते विचारपूर्वक देणं हे आपलं कर्तव्य आहे. पुढचा दीड दिवस हा खरं तर त्याचसाठी आहे, असं म्हणायला हरकत नाही कुणी-कुणी काय-काय सांगितलंय आणि ते तो खरंच करू शकतो का, याचा अंदाज बांधून आपल्याला आपलं मत ठरवायचं आहे. तरुण मतदारांची मतं ही निर्णायक ठरतील, असं बोललं जातं. त्यामुळे तो या मतदानाकडे कसं पाहतोय, यावर बरंच काही अवलंबून आहे. त्याचाच एक छोटा प्रयत्न आम्ही केलाय... बघा, काय म्हणतेय तरुणाई.

आपलं बहुमुल्य मत न विकता, मतदानाचा हक्क बजावा

2019 हे वर्ष राजकीय घडामोडींमुळे लक्षात राहणारं असेल. विविध पक्ष, संघटना स्वतः चं राजकीय चातुर्य पणाला लावत आहेत. एकमेकांवर टीका करून मत मिळवण्याचा प्रयत्न  चालू आहे. सध्याची निवडणूक वैचारिक न राहता ती व्यक्तिकेंद्रीत झालेली आहे. मतांसाठी मतदारांना विविध अमिष दाखवली जात आहे. मात्र लोकांनी आपलं बहुमुल्य मत न विकता आपला मतदानाचा हक्क बजावणं गरजेचं आहे. 

-  अनिल मटकर, भांडुप


पक्ष नाही तर उमेदवार पाहून करणार मतदान

मतदान हा खूप महत्त्वाचा हक्क असून सर्वांनी तो न चुकता बजावला पाहिजे. जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावे यासाठी जनजागृती केली जाते मात्र अजूनही अनेक लोक आपला हक्क बजावत नाहीत. राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. नागरिक या नात्याने आता योग्य उमेदवार निवडणं गरजेचं असणार आहे. त्यामुळेच यंदा कोणत्याही पक्ष पाहून नाही तर उमेदवार आणि त्याने केलेली कामे पाहून मी मतदान करणार आहे. 

- शामली देवरे, नाशिक 

 

लोकहिताची कामं करणाऱ्या पक्षाला पाठिंबा

राजकीय पक्षांच्या प्रचाराची रंगत वाढत चालली आहे. प्रचारसभांमधून अनेक नेते एकमेकांवर घणाघाती टीका करताना पाहायला मिळत आहेत. मात्र देशाच्या सुरक्षिततेचा प्रामुख्याने विचार करणाऱ्या आणि लोकहिताची कामं करणाऱ्या पक्षाला पाठिंबा देणार आहे. तसेच पाणी , वाहतूक यासारख्या दैनंदिन जीवनातील समस्यांवर निवडणुकांनंतर प्रामुख्याने काम होणं गरजेचं आहे. त्यामुळे कामं करणाऱ्या उमेदवाराला मत देणार. 

- राहुल मोहिते, परळ

 

मतदान हा फक्त अधिकार नाही तर कर्तव्य

राजकीय पक्ष प्रचारादरम्यान लोकशाहीचे गुणगाण गाताना दिसतात. नागरिकांना मतदानाच्या दिवशी खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य असतं. त्यामुळे प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. अनेक जण आपल्या एका मताने काय फरक पडणार असा विचार करतात मात्र त्यांनी तसा विचार न करता आपलं मत हे केवळ मत नसून आपलं कर्तव्य आहे हे लक्षात ठेवा. आपलं एक मत चांगला समाज घडवण्यास नक्कीच मदत करू शकतं. 

- सुषमा शिरसट, विक्रोळी

 

राजकारणाकडे गांभीर्याने पाहून मतदान करा

भारताचा विकास हा भारतीय नागरिकांच्या हाती आहे. विशेष म्हणजे तरुणाईची यामध्ये मुख्य भूमिका आहे. त्यामुळेच प्रत्येक सुजाण नागरिकाने राजकारणाकडे गांभीर्याने पाहणं गरजेचं असणार आहे. मतदान हा आपल्याला देण्यात आलेला विशेष अधिकार असून त्याचा सदुपयोग केला पाहिजे. सध्याच्या परिस्थितीचा विचार करता कायद्यांचे उल्लंघन न करणारा तसेच लोकांच्या हिताचा विचार करणारा नेता निवडणं महत्त्वाचं असणार आहे. 

- अनिकेत सुर्वे, कांदिवली

 

Web Title: lok sabha election 2019 opinion of young voters in maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.