पंकजा मुंडेंचं मराठा कार्ड; प्रितम मुंडेंसाठी संभाजी राजे बीडमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 05:37 PM2019-04-16T17:37:05+5:302019-04-16T17:38:11+5:30
मृत्यूपूर्वी गोपीनाथ मुंडे यांनी गरज पडल्यास आपल्या मुलींच्या पाठिशी उभं राहण्याची गळ आपल्याला घातली होती. त्यामुळे मी प्रितम मुंडे यांना आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुभेच्छा देण्यासाठी परळीत आल्याचे संभाजी राजे यांनी सांगितले.
म ंबई - राजकारण आणि जातीची समीकरणे एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याप्रमाणे बीड जिल्ह्यातील राजकारणा आजपर्यंत पुढे चालत आले आहे. बीडमधील प्रत्येक निवडणूक जातीच्या गणितांवर अवलंबून असते. यातून लोकसभा निवडणूकही सुटली नाही. बीडमध्ये पुन्हा एकदा मराठा-वंजारी वाद होण्याची चिन्हे असून प्रमुख उमेदवार जातीची समीकरणे जुळविण्यासाठी प्रयत्नशील आहे. या पार्श्वभूमीवर बीडमध्ये पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीला शह देण्यासाठी छत्रपती संभाजी राजे यांना प्रचारासाठी बोलविले आहे. यामुळे पंकजा यांनी मराठा मतांसाठी प्रचारात संभाजी राजेच्या रुपाने मराठा कार्ड वापरल्याची चर्चा सध्या बीडमध्ये रंगत आहे. मुंडे कुटुंबियांचे आणि आमचे अनेक दिवसांचे संबंध आहेत. माझ्या शिव-शाहू दौऱ्याच्या वेळी गोपीनाथ मुंड यांनी आपल्याला भगवान गडावर बोलवले होते. तसेच मृत्यूपूर्वी त्यांनी गरज पडल्यास आपल्या मुलींच्या पाठिशी उभं राहण्याची गळ घातली होती. त्यामुळे मी प्रितम मुंडे यांना आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुभेच्छा देण्यासाठी परळीत आल्याचे संभाजी राजे यांनी सांगितले. बीडमध्ये मराठा नेते विनायक मेटे यांनी आधीच पंकजा मुंडे आणि भाजपविरोधी भूमिका घेतली आहे. राज्यात भाजपसोबत पण बीडमध्ये राष्ट्रवादीला मदत करणार, असं स्पष्ट केले आहे. त्यामुळे मराठा मते भाजपविरोधी जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हे रोखण्यासाठीच पंकजा यांनी संभाजी राजेंना बीडमध्ये आणल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. संभाजी राजे यांना बोलवून पंकजा यांनी मराठा समाजाला साद घालण्याचा प्रयत्न केला आहे. आता राष्ट्रवादीकडून यावर काय प्रत्युत्तर येणार हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होणार आहे. भाजपच्या वतीने संभाजी राजे यांना राज्यसभेवर घेतले आहे. मी राष्ट्रपती स्विकृत खासदार असलो तरी भाजपच्या मदतीमुळे राज्यसभेवर आहे. त्यामुळे सहाजिकच मोदी पुन्हा सत्तेवर यावे असं आपल्या वाटत असल्याचे संभाजी राजे यांनी सांगितले.