Lok Sabha Election 2019 : 'आयपीएल'मुळे उमेदवारांकडे तरुण कार्यकर्त्यांची वणवण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2019 05:40 PM2019-03-29T17:40:59+5:302019-03-29T17:42:03+5:30
दिवसा उन्हाचा पारा वाढला आहे. त्यामुळे विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडून रात्रीच्या प्रचाराला प्राधान्य दिले जात आहे. मात्र आयपीएल स्पर्धेतील सामने नेमके संध्याकाळी असतात. त्यामुळे पदाधिकाऱ्यांना व उमेदवारांना तरुण कार्यकर्ते शोधूनही मिळत नाही.
मुंबई - देशात एकीकडे लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून दुसरीकडे आयपीएल क्रिकेट स्पर्धेचा रणसंग्राम आहे. तरुण पिढी देखील राजकीय रणधुमाळीपेक्षा आयपीएलला प्राधान्य देताना दिसत आहे. यामुळे लोकसभा उमेदवारांवर तरुण कार्यकर्त्यांसाठी अक्षरश: शोध मोहिम सुरू करण्याची वेळ आली आहे.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत तरुण मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. हीच तरुणाई आगामी लोकसभा निवडणुकीत महत्त्वपूर्ण भूमिका निभावणार आहे. तसेच अनेक उमेदवारांचा जय-पराजय निश्चित करणार आहे. त्यामुळे नेतेमंडळींकडून विविध प्रलोभणे देऊन तरुणांना आकर्षित करण्याची उठाठेव सुरू आहे. परंतु, आयपीएल स्पर्धेच्या लढतींना तरुण मंडळी अधिक वेळ देत आहे. त्यामुळे सहाजिकच नेत्यांना तरुण कार्यकर्त्यांची उणीव भासत आहे. तसेच नेते मंडळींना दोन-चार कार्यकर्त्यांना सोबत घेऊन मते मागण्याची वेळ आली आहे. जे की २०१४ च्या निवडणुकीत उमेदवारांकडे कार्यकर्त्यांची फौज असायची.
दरम्यान दिवसा उन्हाचा पारा वाढला आहे. त्यामुळे विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडून रात्रीच्या प्रचाराला प्राधान्य दिले जात आहे. मात्र आयपीएल स्पर्धेतील सामने नेमके संध्याकाळी असतात. त्यामुळे पदाधिकाऱ्यांना व उमेदवारांना तरुण कार्यकर्ते शोधूनही मिळत नाही. ऐन निवडणुकीच्या काळात आलेली आयपीएल स्पर्धा राजकीय पुढाऱ्यांसाठी आणि पक्षांसाठी डोकेदुखीची ठरत असल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे.
दुसरीकडे उमेदवारांकडून गावोगावी भेटी देण्याचा कार्यक्रम सुरू आहे. या कार्यक्रमांसाठी कार्यकर्त्यांची कमतरता आहे. पण प्रचार ऐन भरात आल्यानंतर नेतेमंडळी तरुण कार्यकर्त्यांची कमतरता कशी भरून काढतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.