भाजपवाले राज ठाकरेंमुळे कसे झाले बेजार ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2019 11:10 AM2019-04-07T11:10:21+5:302019-04-07T11:10:23+5:30
मी २०१४ मध्ये मोदींना पाठिंबा देणारा पहिला नेता होतो. मात्र पंतप्रधान झाल्यावर हा माणूस एवढा बदलला की, मला माझी भूमिका बदलावी लागल्याचे राज ठाकरे यांनी नमूद केले.
मुंबई - लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. राष्ट्रीय पक्षांच्या नेत्यांचे महाराष्ट्र दौरे सुरू झाले असून अनेक ठिकाणी सभा होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा देखील महाराष्ट्र दौरा झाला आहे. यापुढेही महाराष्ट्रात नरेंद्र मोदी यांच्या सभा होणार आहेत. परंतु, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्यामुळे भाजपवाले चांगलेच बेजार झाले आहे. २०१४ च्या निवडणुकीत राज ठाकरे यांच्या भूमिकेमुळे भाजपला फायदाच झाला होता. परंतु, यावेळी राज ठाकरे यांनी मोदीविरुद्ध भूमिका घेत शनिवारी घेतलेल्या मेळाव्यात मोदींचा खोटेपणा पुराव्यानिशी माध्यमांसमोर मांडला. त्यामुळे मोदींची प्रतिमा आणखी खराब होण्याच्या मार्गावर असून यामुळे भाजपवाले बेजार होणार, असं चित्र आहे.
राज ठाकरे यांनी पाडवा मेळाव्यात मोदींवर कडाडून टीका केली. तसेच राहुल गांधी यांना एकदा संधी देऊन पाहण्याचे आवाहन केले. काँग्रेस विरोधात असल्यावर त्याचे महत्त्व कळते, असंही राज यांनी सांगितले. तसेच मी २०१४ मध्ये मोदींना पाठिंबा देणारा पहिला नेता होतो. मात्र पंतप्रधान झाल्यावर हा माणूस एवढा बदलला की, मला माझी भूमिका बदलावी लागल्याचे राज ठाकरे यांनी नमूद केले.
पंतप्रधान मोदी प्रत्येक प्रचार सभेत सैन्याचा पराक्रम आणि आम्ही सैन्याला दिलेले अधिकार याविषयी सांगत असतात. राज ठाकरे यांनी हाच धागा पकडून काश्मीरमध्ये मोदींनी दिलेल्या भाषणांची क्लिप सर्वांना ऐकवली. त्यात, आपणच सैनिकांवर कारवाई करण्याचे आदेश दिल्याचे मोदी काश्मीरमधील सभेत सांगताना दिसत होते. त्यामुळे मोदी खोट बोलत असल्याचे स्पष्ट झाले. दुसरी बाब म्हणजे, मोदींच्या बीफ निर्यातीसंदर्भातील भूमिकेसंदर्भातील क्लिप राज यांनी सर्वांना ऐकवली. त्यामुळे मोदींचा दुटप्पीपणा समोर आल्याचे मनसेच्या वतीने सांगण्यात येत आहे.
दरम्यान राज ठाकरे यांनी दिलेल्या पुराव्यांची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. २०१४ मध्ये मोदींच्या समर्थनात जशी चर्चा होती, तशी चर्चा आता मोदींच्या जुन्या क्लिपची आहे. यामुळे मोदींवर नेटकरी टीका करत आहेत. भाजपमध्ये मोदी स्टार प्रचारक आहेत. मात्र सोशल मीडियावर मोदींना होत असलेला विरोध पाहता भाजप नेत्यांच्या चितेंत वाढ होण्याची शक्यता आहे.