राज ठाकरेंनी शिवसेनेला अनुल्लेखाने मारले !
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2019 12:37 PM2019-04-07T12:37:36+5:302019-04-07T15:20:49+5:30
राज ठाकरे यांनी ६० पेक्षा अधिक आमदार आणि १० हून अधिक खासदार असलेल्या शिवसेनेला गृहितही धरले नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
मुंबई - शिवसेनेशी झालेल्या मतभेदानंतर आपला सवता सुबा निर्माण करणाऱ्या राज ठाकरे यांनी आपल्या जाहीर सभांमधून सर्वाधिक प्रमाणात शिवसेना आणि शिवसेनेच्या नेतृत्वावर टीका केली, अवघ्या महाराष्ट्राने पाहिलं आहे. हे रोखण्यासाठी आणि राज-उद्धव समेट घडविण्यासाठी अनेक प्रयत्नही झाले. परंतु, त्याचा काहीही फायदा झाला नाही. याउलट शिवसेना-मनसे यांच्यात शाब्दिक चकमक सुरूच असते. परंतु, शनिवारी झालेल्या गुडीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी ६० पेक्षा अधिक आमदार आणि १० हून अधिक खासदार असलेल्या शिवसेनेला गृहितही धरले नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
२०१४ ते २०१८ या कालावधीत भाजप-शिवसेना यांची युती झाली. त्यानंतर वाद झाले, वाद एवढे विकोपाला गेले की, शिवसेना नेत्यांनी राजीनामा खिशात ठेवण्यास सुरुवात केली. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत तर भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी अफजल खान म्हणून संबोधले होते. अलिकडच्या काळात तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युती नाहीच, अशी भूमिका जाहीर केली. मात्र भाजप नेतृत्वाने फिरवलेली जादुची कांडी अशी चालली की, शिवसेना-भाजप सख्ख्या भावाप्रमाणे वागू लागले. उद्धव ठाकरे एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी मोदींना विष्णूचा अवतार म्हणून संबोधले.
या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी गुडीपाडवा मेळावा घेतला. या मेळाव्यात राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अमित शाह यांच्यावर घणाघाती टीका केली. मोदी, शाह या जोडगोळीला हद्दपार करा, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले. परंतु, यावेळी राज यांनी शिवसेनेचा उल्लेख देखील केला नाही. भाजपसोबत गेलेल्या शिवसेनेवर राज ठाकरे जोरदार टीका करणार अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती. परंतु, राज यांनी शिवसेनेचा साधा उल्लेखही न करणे हीच मोठी टीका असल्याचे अनेकांचे मत आहे. अर्थात राज यांनी शिवसेनेला अनुल्लेखानेच मारले, अशी मनसे सैनिकांची भावना आहे.