Lok Sabha Election 2019 : राज ठाकरे, नरेंद्र मोदी यांच्या तोफा एकाच दिवशी धडाडणार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2019 02:28 PM2019-04-04T14:28:19+5:302019-04-04T14:29:51+5:30
२०१४ मध्ये मोदींना पंतप्रधान करा, असे आवाहन करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचा गुडीपाडवा मेळावा आहे. राज ठाकरे यांनी मोदी-अमित शाह यांच्याविरुद्ध दंड थोपटले असल्याने त्यांच्या गुडीपाडवा मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुंबई - लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील महाराष्ट्रातील दौऱ्यांना सुरुवात केली आहे. महाराष्ट्रातील मोदींची पहिली सभा वर्ध्यात झाली होती. त्या सभेत मोदींनी विरोधकांवर जोरदार टीका केली होती. त्यानंतर आता मोदींची शनिवारी काँग्रेसचा गड असलेल्या नांदेडमध्ये जाहीर सभा होणार आहे. त्याचवेळी २०१४ मध्ये मोदींना पंतप्रधान करा, असे आवाहन करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचा गुडीपाडवा मेळावा आहे. राज ठाकरे यांनी मोदी-अमित शाह यांच्याविरुद्ध दंड थोपटले असल्याने त्यांच्या गुडीपाडवा मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी नांदेडमध्ये सभा घेणार आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसला दोनच जागा जिंकता आल्या होत्या. त्यामध्ये नांदेड आणि हिंगोलीचा समावेश होता. आता देखील अशोक चव्हाण यांना नांदेडमधून काँग्रेसची उमेदवारी देण्यात आली आहे. यावेळी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी नांदेडमध्ये दाखल होणार आहे. नांदेडमधून प्रतापराव चिखलीकर यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. मोदींच्या सभेमुळे नांदेडमधील लढत आणखी रंगतदार होण्याची शक्यता आहे.
वर्ध्यात विरोधकांवर जोरदार टीका करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी नांदेडमध्ये विकासावर बोलणार की, विरोधकांच्या घराणेशाहीवर याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. वर्ध्याच्या सभेत मोदींनी शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबियांना लक्ष्य केले होते.
दरम्यान राज ठाकरे यांच्या मुंबईतील गुडीपाडवा मेळाव्याकडे देखील सर्वांचे लक्ष लागले आहे. आधीच राज ठाकरे यांनी भाजपला विरोध करत मोदींना रोखण्यासाठी दंड थोपटले आहे. राज ठाकरे गेल्या काही महिन्यांपासून व्यंगचित्रातून मोदी आणि शाह यांना लक्ष्य करत आहेत. त्यामुळे शनिवारी राज काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज ठाकरे यांच्या सभांना होणारी गर्दी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची नांदेडमधील सभा यामुळे शनिवारी महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघणार आहे.