Lok Sabha Election 2019 : रासपची दोन जागांची मागणी, अन्यथा...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 05:41 PM2019-03-22T17:41:08+5:302019-03-22T17:41:56+5:30
भाजप रासपची मागणी पूर्ण करेल, असा विश्वास व्यक्त करताना दोडतले यांनी कार्यकर्त्यांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे.
मुंबई - राज्यात भारतीय जनता पक्षासोबत सत्तेत सहभागी असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाने लोकसभा निवडणुकीत दोन जागांची मागणी युतीकडे केली आहे. त्यावर युतीकडून अद्याप काहीही निर्णय देण्यात आला नाही. त्यामुळे राष्ट्रीय समाज पक्ष लोकसभा निवडणुकीतील आपली भूमिका पुढील दोन दिवसांत स्पष्ट करेल, असं रासपच्या वतीने सांगण्यात आले आहे.
युतीकडे दोन जागांची मागणी करण्यात आली आहे. मात्र त्यावर अद्याप काहीही उत्तर मिळाले नाही. त्यामुळे दोन दिवसांत आमची भूमिका स्पष्ट करू असे, रासपचे महासचिव बाळासाहेब दोडतले यांनी म्हटले आहे. तसेच लोकसभेच्या दोन जागांसाठी पशुसंवर्धन, दुग्धविकास व मस्त्यव्यवसाय मंत्री महादेव जाणकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करत आहे. भाजप देखील रासपची मागणी पूर्ण करेल, असा विश्वास व्यक्त करताना दोडतले यांनी कार्यकर्त्यांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. शनिवारी रासपचा पुण्यात कार्यकर्ता मेळावा आहे, या मेळाव्यात पक्षाची भूमिका स्पष्ट करण्यात येणार असल्याचे दोडतले यांनी कळविले आहे.
दरम्यान लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून भाजप आणि शिवसेना पक्षांनी उमेदवारांची पहिली यादी देखील जाहीर केली आहे. मात्र यात घटकपक्षांना जागा देण्याचे अद्याप कुठेही म्हटले नाही. याआधी रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडियाचे रामदास आठवले यांनी देखील भाजपकडे एक तरी जागा देण्याची मागणी केली आहे. परंतु, भाजपने या मागणीला फारसे गांभीर्याने घेतले नसल्याचे कळते. त्यामुळे रासपच्या मागणीवर भाजप काय निर्णय घेणार हे पाहणे देखील औत्सुक्याचे ठरणार आहे.