Lok Sabha Election 2019 : वयाच्या 79 वर्षीय शरद पवारांनी घेतल्या 78 सभा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2019 05:42 PM2019-04-28T17:42:34+5:302019-04-28T18:15:44+5:30
प्रचंड उन्हाचा पारा बघता अनेक उमेदवार आणि राजकीय नेते सकाळी आणि संध्याकाळी प्रचाराला बाहेर पडताना पहायला मिळत होते. मात्र शरद पवार याला अपवाद असून त्यांचा पूर्ण दिवस प्रचारात आणि प्रवासात व्यस्त असल्याचे दिसून येत होते.
मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्यातील प्रचार शनिवारी संपला. चारही टप्प्यात राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवारांनी एकूण 78 सभा घेतल्या. अनेक ठिकाणी उन्हाचा पारा 40 डिग्री सेल्सियसपर्यंत पोहचला असल्याचे पहायला मिळाले. अशा उन्हातही 79 वर्षीय शरद पवारांच्या सभांचा धडका सुरूच होता. दिवसातून तीन सभांना शरद पवार हजेरी लावत असल्याचे पहायला मिळाले. तरूण राजकीय नेत्याला ही शक्य होणार नाही एवढी प्रचंड मेहनत शरद पवार घेताना दिसले.
रोजचा नियोजित दौरा करून पवार तीन सभांना उपस्थित राहत असे. डोक्यावर प्रचंड उन्ह असताना ही पवारांनी आपल्या सभा पार पाडल्या. प्रचंड उन्हाचा पारा बघता अनेक उमेदवार आणि राजकीय नेते सकाळी आणि संध्याकाळी प्रचाराला बाहेर पडताना पहायला मिळत होते. मात्र शरद पवार याला अपवाद असून त्यांचा पूर्ण दिवस प्रचारात आणि प्रवासात व्यस्त असल्याचे दिसून येत होते.
महाराष्ट्रातील अनके भागात शरद पवारांनी महाआघडीच्या उमेदवारांसाठी सभा घेतल्या. काँग्रेसमध्ये महाराष्ट्रात विशेष असा चेहरा उरला नाहीत, त्यामुळे राष्ट्रवादी बरोबरच कॉंग्रेसमधून सुद्धा पवारांच्या सभांना मागणी होती. शरद पवार नियोजित प्रत्यके सभेला हजेरी लावताना पहायला मिळाले.
शरद पवार यांच्यावरच आरोप करण्याची कोणतेही संधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोडली नाही. मोदींनी महाराष्ट्रातील आपल्या प्रत्येक सभेत शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. सत्ताधारी पक्षाच्या वतीने संपूर्ण ताकदीचा वापर केला जात असताना सुद्धा शरद पवार आपल्या भाषणातून सडेतोड उत्तर देत असल्याचे पहायला मिळाले.