मोदींना शिवसेनेपेक्षा शरद पवारचं वाटतायत जवळचे ?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2019 07:06 PM2019-04-09T19:06:51+5:302019-04-09T19:08:41+5:30
व्यासपीठावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित असताना मोदींनी शरद पवार आपल्यासोबत असायला हवे होते, अशी अप्रत्यक्ष इच्छाच व्यक्त केली. त्यामुळे मोदींना शिवसेनेपेक्षा पवारच जवळचे वाटतात का असा प्रश्न उपस्थि होत आहे.
मुंबई - लोकसभा निवडणुकीचा प्रचार रंगात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील लोकसभेच्या प्रचाराला वर्ध्यातून सुरुवात केली. वर्ध्यातील सभेत मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्यावर कडाडून टीका केली होती. मात्र त्याच पवारांविषयी पंतप्रधान मोदी लातूर सभेत मवाळ झाल्याचे चित्र आहे. विषेश म्हणजे व्यासपीठावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित असताना मोदींनी शरद पवार आपल्यासोबत असायला हवे होते, अशी अप्रत्यक्ष इच्छाच व्यक्त केली. त्यामुळे मोदींना शिवसेनेपेक्षा पवारच जवळचे वाटतात का असा प्रश्न उपस्थि होत आहे.
२०१४ मध्ये एनडीए सत्तेवर आल्यापासून शिवसेना आणि भाजप यांच्यात ढासपूस सुरू आहे. एकमेकांवर दर्जाहिन टीका केल्यामुळे उभय पक्षांमधील वाद विकोपाला गेला होता. मात्र शिवसेनेचा विरोध मोडून काढत भाजपने लोकसभेसह विधानसभेसाठी शिवसेनेसोबतची युती निश्चित केली. त्यानंतर भाजप आणि शिवसेनेकडून एकमेकांचे कौतुकही सुरू झाले. परंतु, ही युती अजुनही तळ्यातमळ्यात असल्याचे चित्र आहे. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी एका कार्यक्रमात युती असली तरी नोटबंदी सारख्या चुकीच्या निर्णयावरून युतीतील मतभेद कायम राहतील असं म्हटलं आहे. तर उद्धव यांनी देखील सामनातून शेतकरी समस्यांवर सरकारला घरचा आहेर दिला होता.
या सर्व पार्श्वभूमीवर लातूर येथील मोदींच्या सभेसाठी उद्धव ठाकरे यांनी आवर्जुन हजेरी लावली. यावेळी उद्धव आपले छोटे भाऊ असल्याचे उद्गार मोदींनी काढले. त्याचवेळी भाषणात मोदींनी शरद पवारांविषयी आपली खंत न राहून व्यक्त केली. काँग्रेसवर टीका करणारे मोदी म्हणाले की, शरद पवार आघाडीत शोभत नाही. त्यामुळे लोकसभा निवडणूक त्रिशंकू झाल्यास आगामी स्थितीसाठी मोदी पवारांना एनडीएमध्ये येण्यासाठी गळ तर घालत नाही, ना अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.
याआधीच उद्धव यांनी कुणलाही पक्षात घ्या पण, शरद पवारांना भाजपमध्ये घेऊ नका असं सूचक वक्तव्य केले होते. परंतु, मोदींनी अप्रत्यक्षपणे पवार एनडीएमध्ये हवे असं म्हटल्याने शिवसेनेचे टेन्शन वाढण्याची शक्यता आहे.