Lok Sabha Election 2019 : शरद पवार सेनेची गुजरातवर स्वारी !
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2019 01:13 PM2019-03-29T13:13:42+5:302019-03-29T13:14:57+5:30
दिल्लीत मराठा नेते म्हणून प्रसिद्ध असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी गुजरातमधून 'एकला चलो रे'चा नारा दिला आहे. त्यामुळे गुजरात स्वारीसाठी शरद पवार सेना सज्ज झाल्याचे चित्र आहे.
मुंबई - लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे. अनेक पक्षांनी उमेदवार जाहीर केले असताना अनेक राज्यांत युती आणि आघाडीची बोलणी अजुनही अंतिम टप्प्यात आहे. अनेक जागांवरून तिढा सुटत नसल्याने काही पक्षांनी 'एकला चलो रे' ची भूमिका घेतल्याचे चित्र आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल होत नाही, तोपर्यंत जागा वाटपाचे चित्र स्पष्ट होईल, यावर प्रश्नचिन्हच आहे.
बिहार आणि दिल्लीत काँग्रेसचे मित्र पक्षासोबतचे चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप आटोपलेले नाही. गुजरातमधील स्थिती देखील यापेक्षा वेगळी नाही. दिल्लीत मराठा नेते म्हणून प्रसिद्ध असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी गुजरातमधून 'एकला चलो रे'चा नारा दिला आहे. त्यामुळे गुजरात स्वारीसाठी शरद पवार सेना सज्ज झाल्याचे चित्र आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस इतिहासाची पुनरावृत्ती तर नाही करत नाही ना, असा प्रश्न उपस्थित होते आहे. शरद पवार यांच्या या भूमिकेने ४०० वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या गुजरात लुटीच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी गुजरातची लूट केली होती.
याआधी झालेल्या विधानसभा निवडणुकीत देखील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची गुजरातमध्ये युती झाली नव्हती. त्यामुळे काँग्रेसला अनेक जागांवर पराभवाला समोरे जावे लागले होते. अनेक जागांवर काँग्रेसच्या पराभवातील फरकापेक्षा अधिक मते राष्ट्रवादीने घेतली होती. त्यामुळे स्वबळाचा नारा देणाऱ्या राष्ट्रवादीला सोबत घेण्यासाठी काँग्रेस पुढाकार घेणार की, राष्ट्रवादी पुन्हा एकदा स्वबळावर लढणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.