Lok Sabha Election 2019 : दानवेंचा प्रचार करण्यास शिवसैनिकांचा विरोध
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2019 04:49 PM2019-04-03T16:49:03+5:302019-04-03T16:49:10+5:30
रावसाहेब दानवे यांच्याकडून शिवसैनिकांना सन्मान दिला जात नाही व विश्वासात घेतले जात नाही, तरी देखील त्यांना मदत का करायची असा सवाल शिवसैनिकांनी उपस्थित केला.
मुंबई - जालना लोकसभा मतदारसंघातील रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांच्यातील वाद सोडवण्यात मुख्यमंत्री देवींद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांना यश आले असली तरी, दानवेंना मतदारसंघातील शिवसैनिकांचा विरोध कायम आहे. पैठण येथे युतीबाबत शिवसेनेच्या बैठकीत दानवे शिवसैनिकांना विश्वासात घेत नसल्याचे सांगत शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त केली.
जालना मतदारसंघातील पैठण तालुक्यातील शिवसैनिकांनी दानवे यांचा प्रचार करण्यास विरोध केला. सोमवारी पैठण येथे शिवसेना आमदार संदीपान भुमरे यांच्या अध्यक्षतेखाली जालना लोकसभा युतीबाबत शिवसेनेची बैठक ठेवण्यात आली होती. बैठकीत पैठण तालुक्यातील शिवसैनिकांनी हजेरी लावली होती. रावसाहेब दानवे यांच्याकडून शिवसैनिकांना सन्मान दिला जात नाही व विश्वासात घेतले जात नाही, तरी देखील त्यांना मदत का करायची असा सवाल शिवसैनिकांनी उपस्थित केला.
मागील पाच वर्षांत मतदारसंघात दानवेंनी शिवसेनेला सुरुंग लावण्याच्या प्रयत्न केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर रावसाहेब दानवे यांनी नेहमी खालच्या भाषेत टीका केली आहे. आता परत त्यांचाच प्रचार कसा करावा असा सवाल उपस्थित शिवसैनिकांनी केला. बैठकीतील विरोधाचा सूर लक्षात घेता आमदार भुमरेंनी शिवसैनिकांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. लवकरच दानवे यांच्यासोबत आपण बैठक घेऊन, त्यांना याबाबत बोलू व पुढील निर्णय असे कार्यकर्त्यांना भुमरे यांनी सांगितले. त्यामुळे दानवे मतदारसंघातील शिवसैनिकांची मनधरणी कशी करणार, अशी चर्चा जालना मतदारसंघात सुरू आहे.