कोण हे, माढ्याचे संजय मामा ?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 12:46 PM2019-03-22T12:46:23+5:302019-03-22T12:48:16+5:30
सरपंचपदापासून राजकारणाची सुरुवात करणारे संजय शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परतणार आहेत.
मुंबई - माढा लोकसभा मतदार संघातील उमेदवारीवरून राष्ट्रवादी काँग्रेससमोर निर्माण झालेला पेच आता संपुष्टात येण्याची शक्यता आहे. सोलापूर जिल्हा परिषदेचे भाजप पुरस्कृत अध्यक्ष संजय शिंदे यांना माढ्यातून लोकसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. सरपंचपदापासून राजकारणाची सुरुवात करणारे संजय शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परतणार आहेत.
माढा मतदार संघात रणजितसिंह मोहिते पाटील यांना विरोध करण्यासाठी संजय शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकला होता. त्यानंतर त्यांनी स्वाभीमानी शेतकरी संघटनेकडून करमाळा विधानसभा निवडणूक लढवली होती. परंतु त्यांचा थोडक्यात पराभव झाला होता. आता रणजिंतसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे शिंदे यांनी राष्ट्रवादीत परतण्याचा निर्णय घेतला असून त्यांना माढ्यातून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. असं झाल्यास रणजीतसिंह मोहिते पाटलांना माढामधून राष्ट्रवादीचे तगडे आव्हान मिळणार आहे. त्यामुळे माढातील लढत आणखीनच चुरशीची होणार आहे.
वास्तविक पाहता मोहिते पाटलांना भाजपमध्ये प्रवेश देण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय शिंदे यांना माढ्याच्या उमेदवारीविषयी विचारले होते. परंतु त्यांनी त्यावेळी आपण करमाळा मतदार संघातून विधानसभा लढविण्यासाठी इच्छूक असल्याचे म्हटले होते. आता मात्र त्यांनी राष्ट्रवादीत परतण्याचा निर्णय घेत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.
सरपंचपदापासून राजकारणाची सुरुवात
महाविद्यालयीन जीवनापासूनच राजकारणात सक्रिय असलेले संजय शिंदे यांनी सरपंच पदापासून आपला राजकीय प्रवास सुरू केला. ते दहा वर्षे निमगावचे सरपंच होते. त्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार आणि थोरले बंधू बबनराव शिंदे यांच्या सहकार्याने १९९९ मध्ये संजय शिंदे कुर्डूवाडी पंचायत समितीच्या सभापतीपदी विराजमान झाले होते. २०१४ मध्ये त्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकून स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करमाळा विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर शिंदे जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले आणि जिल्हा परिषदेचे बिनविरोध अध्यक्षही झाले. म्हैसगाव येथील विठ्ठल कॉर्पोरेशन साखर कारखान्याचे शिंदे संस्थापक चेअरमन असून विठ्ठल सुतगिरनीचे ते अध्यक्ष आहेत. तसेच सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे शिंदे संचालक असून माढा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन आहेत.