ठाकरे गटात प्रवेश? संजय राऊतांच्या भेटीनंतर उन्मेष पाटलांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2024 01:49 PM2024-04-02T13:49:00+5:302024-04-02T13:49:56+5:30
BJP MP Unmesh Patil News: भाजपात उमेदवारी नाकारल्यामुळे नाराज असलेल्या उन्मेष पाटील यांनी संजय राऊतांची भेट घेतली. जळगावची जागा ठाकरे गटाकडे असल्याने या भेटीला वेगळे महत्त्व आल्याचे बोलले जात आहे.
BJP MP Unmesh Patil News: लोकसभा निवडणुकीसाठी काही जागांवर घोडे अडलेले असले तरी बहुतांश जागांवर भाजपाने उमेदवार जाहीर केले आहेत. तसेच मित्रपक्षांनाही जागा दिल्या आहेत. यावरून भाजपामधील काही नेते नाराज असल्याचे बोलले जात आहेत. भाजपा खासदार उन्मेष पाटील यांची पुन्हा एकदा लोकसभा लढवण्याची इच्छा होती. मात्र, त्यांना भाजपाने उमेदवारी नाकारली. यानंतर आता उन्मेष ठाकरे यांनी थेट संजय राऊत यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
उन्मेष पाटील हे जळगावचे खासदार आहेत. यावेळी भाजपाने पाटील यांचे तिकीट कापून माजी आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली आहे. उन्मेष पाटील यांना भाजपातून अंतर्गत विरोध होता, अशी चर्चाही होती. भाजपाने उमेदवारी न दिल्याने नाराज असलेले उन्मेष पाटील यांनी थेट संजय राऊतांची भेट घेतली. यामुळे ठाकरे गट भाजपाला जळगावमध्ये तगडा झटका देण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.
संजय राऊतांच्या भेटीनंतर उन्मेष पाटील म्हणाले...
प्रसारमाध्यमांशी बोलताना उन्मेष पाटील म्हणाले की, आपला मनापासून आदर करतो. आपले सगळे प्रश्न, शंका, सूचना याबाबत लवकरच सविस्तर बोलेन. आता बोलणे उचित होणार नाही. लवकरच मोकळेपणाने संवाद साधेन. मी आणि संजय राऊत संसदेत सोबत काम केले आहे. आमची संजय राऊतांशी आणि सहकाऱ्यांशी कायम चर्चा होत असते. त्यानिमित्ताने संवाद साधायला आलो. प्रत्येक गोष्टीत आपण राजकारण म्हणून पाहू नका. राजकारणापलीकडे मैत्री जपली गेली पाहिजे. आताच्या घडीला मैत्री जपली जात नाही आणि ती मैत्री जपण्याचा हा प्रयत्न आहे. बाकी काही नाही, अशी प्रतिक्रिया उन्मेष पाटील यांनी दिली.
दरम्यान, महाविकास आघाडीमध्ये जळगावची जागा ठाकरे गटाकडे आली आहे. ठाकरे शिवसेनेकडून डॉ. हर्षल माने आणि माजी नगराध्यक्ष कुलभूषण पाटील हे इच्छुक आहेत. ठाकरे गटाने अद्याप जळगावचा उमेदवार जाहीर केलेला नाही. यामुळे उन्मेष पाटील आणि संजय राऊतांची भेट महत्त्वाची मानली जात आहे. भाजपने तिकीट नाकारल्यानंतर उन्मेष पाटील नाराज होते. आता ठाकरे गटात प्रवेश करून जळगाव जागेसाठी उन्मेष पाटील यांना उमेदवारी दिली जाते का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. असे झाल्यास भाजपासाठी तो मोठा धक्का असेल, असे म्हटले जात आहे.