शिवसेना पदाधिकाऱ्यांना CM एकनाथ शिंदेंच्या सूचना; आमदारांनाही दिल्या कानपिचक्या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2024 05:16 PM2024-03-21T17:16:07+5:302024-03-21T17:16:42+5:30

मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमदार, पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यातून लोकसभा निवडणुकीसाठी शिंदेंनी मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. 

Lok sabha election 2024: CM Eknath Shinde's instructions to Shiv Sena office bearers and MLA | शिवसेना पदाधिकाऱ्यांना CM एकनाथ शिंदेंच्या सूचना; आमदारांनाही दिल्या कानपिचक्या

शिवसेना पदाधिकाऱ्यांना CM एकनाथ शिंदेंच्या सूचना; आमदारांनाही दिल्या कानपिचक्या

मुंबई -  Eknath Shinde to Shivsena MLA ( Marathi News ) आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण सूचना केल्या. त्यात प्रामुख्याने येत्या निवडणुकीत प्रत्येक आमदारांच्या मतदारसंघात किती लीड मिळेल त्यावर पुढचं प्रगती पुस्तक ठरणार आहे. विरोधक पातळी सोडून बोलत असले तरी त्यांच्यावर असभ्य भाषेत बोलू नका असा सल्ला शिंदेंनी दिला आहे. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलं की, सरकारच्या माध्यमातून आपण केलेली कामे लोकांपर्यंत पोहचवा. आपण मराठा आरक्षण दिलेले आहे ते कोर्टात टिकणारे आरक्षण दिलंय. कुठल्याही समाजावर अन्याय केलेला नाही. त्याचसोबत स्थानिक पक्षांतर्गत आणि महायुतीतील वाद ताबडतोब मिटवावेत, नाराज पदाधिकाऱ्यांशी संवाद साधावा. पक्षप्रवेश आणि मतांसाठी मदत घ्या. निवडणुकीसाठी मध्यवर्ती कार्यालय २४ तास कार्यरत ठेवा. प्रत्येक विधानसभा क्षेत्रात कार्यालय कार्यान्वित करून कामाला सुरुवात करा असंही पदाधिकाऱ्यांनी आणि लोकसभा निरिक्षकांना म्हटलं आहे. 

तसेच विधानसभा निहाय बैठका घेऊन संघटना अॅक्शन मोडमध्ये आणा. शाखांशी संपर्क ठेवा. चौकात सभा घ्या. संयुक्तपणे घरोघरी प्रचार करा. व्होटिंग स्लीप वाटा. मोठ्या सभांसाठी रॅलीसाठी समन्वयाने काम करा. प्रचार साहित्यावर प्रोटोकॉलनुसार पदाधिकाऱ्यांची नावे, फोटोंचा वापर करा. महत्त्वाच्या ठिकाणी बॅनर्स, पोस्टर्स, होर्डिंगसाठी परवानगी घ्या. मत वाढवण्यासाठी सामाजिक संघटनांशी सातत्याने संपर्क ठेवा. निवडणुकीच्या नियमांचे कुणीही भंग करत असेल तर त्याचा रिपोर्ट मध्यवर्ती कार्यालयात करावा असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले. 

आमदारांनाही दिला सूचक सल्ला

आगामी निवडणुकीत आमदार म्हणून जेवढा लीड द्याल त्यावर तुमचं प्रगती पुस्तक ठरेल. निवडणुकीतील खरी परिक्षा तीच असेल. मला कुणी फसवू शकत नाही. सर्वांची कुंडली माझ्याकडे आहे. पुढचं तिकीट मिळेल की नाही हे त्यावर अवलंबून असेल. आमदार, पदाधिकारी, जिल्हाप्रमुखांची तीच कसोटी असेल. माझ्याकडे सर्व जिल्ह्यांची खबरबात असते. पक्षाची शिस्त बिघडवू देवू नका. बाळासाहेब कार्यकर्त्यांना सवंगडी समजायचे तर हे लोक घरगडी समजायचे. त्यामुळे कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडू नका असा सूचक सल्लाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पदाधिकारी, आमदारांना दिला आहे. 
 

Web Title: Lok sabha election 2024: CM Eknath Shinde's instructions to Shiv Sena office bearers and MLA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.