...अन्यथा मैत्रीपूर्ण लढतीसाठी तयार राहा; दिंडोरीमध्ये माकपाने दिला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2024 09:25 AM2024-04-21T09:25:46+5:302024-04-21T09:26:36+5:30
दिंडोरीत शरद पवार गटाच्या वतीने भास्कर भगरे यांना उमेदवारी देण्यात आली असून, ही जागा माकपाला हवी होती.
नाशिक : दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या वतीने भास्कर भगरे यांना उमेदवारी देण्यात आल्यानंतर माकपने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अजूनही वेळ गेलेली नाही, ही जागा माकपाला सोडा अन्यथा मैत्रीपूर्ण लढतीसाठी तयार राहा, असा इशाराच माकपाचे नेते डॉ. डी. एल. कराड आणि माजी आमदार जीवा पांडू गावित यांनी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांना दिला.
शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी २० एप्रिलला ओझर येथे माकप नेते डॉ. डी. एल. कराड आणि माजी आमदार जीवा पांडू गावित यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र माकपचे नेते ऐकण्यास तयार नसल्याने ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या समोरच यासंदर्भात तोडगा काढण्याचे ठरले. दिंडोरीत शरद पवार गटाच्या वतीने भास्कर भगरे यांना उमेदवारी देण्यात आली असून, ही जागा माकपाला हवी होती.
विधानसभेत संधी देऊ
जयंत पाटील यांनी दिंडोरीतील जागेसंदर्भात तोडगा काढण्यासाठी विधानसभा निवडणुकीत माकपाला अधिक संधी देऊ असे सांगितले, मात्र आधी लोकसभेबाबत बोला, असा माकपाचा पवित्रा होता. अखेरीस शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबई किंवा पुणे येथे बैठक घेऊ, असे पाटील यांनी सांगितले.