लोकसभा निवडणूक 2024: राज ठाकरे भाजपसोबत गेले, तर उत्तर भारतीय काय करणार?

By अतुल कुलकर्णी | Published: March 23, 2024 05:23 AM2024-03-23T05:23:00+5:302024-03-23T05:24:37+5:30

उत्तर भारतीयांना करून दिली जात आहे हल्ल्यांची आठवण

Lok Sabha Election 2024 If Raj Thackeray join hands With BJP, What Will North Indians Do? | लोकसभा निवडणूक 2024: राज ठाकरे भाजपसोबत गेले, तर उत्तर भारतीय काय करणार?

लोकसभा निवडणूक 2024: राज ठाकरे भाजपसोबत गेले, तर उत्तर भारतीय काय करणार?

अतुल कुलकर्णी, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे भाजपसोबत हातमिळवणी करणार, अशा बातम्या येत आहेत. राज ठाकरे यांना एक लोकसभा मतदारसंघ द्यायचा आणि त्या बदल्यात त्यांनी भाजपसोबत महायुतीचे घटक पक्ष म्हणून यायचे, अशा राजकीय हालचाली सुरू आहेत. मात्र राज ठाकरे भाजपसोबत गेले तर उत्तर भारतीय मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी निर्माण होईल. ज्या पद्धतीने राज यांच्या मनसेने बिहार, यूपीच्या मुंबईत राहणाऱ्या नागरिकांना मुंबईतच चोप दिला होता. लोक अजूनही ते विसरलेले नाहीत, याची आठवण अनेक नेते करून देत आहेत.

२७ नोव्हेंबर २००५ रोजी राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली. त्यानंतर अवघ्या तीन महिन्यांत म्हणजे ९ मार्च २००६ रोजी त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची स्थापना केली. पक्ष स्थापना करताना त्यांनी कडव्या मराठीपणाचा मुद्दा उचलला होता. त्यानंतर ३ फेब्रुवारी २००८ रोजी मनसेने उत्तर भारतीयांच्या विरोधात मुंबईत तीव्र आंदोलन सुरू केले. मुंबई आणि महाराष्ट्रातील काही भागात बिहार, उत्तर प्रदेशातून आलेल्या टॅक्सी ड्रायव्हरना मारहाण करणे, त्यांच्या संपत्तीचे नुकसान करणे अशा घटना घडल्या. त्यातून मनसेची प्रतिमा मराठीचा आणि मराठी माणसांचा कैवार घेणारा पक्ष अशी करण्यात राज यशस्वी झाले होते. त्याच वर्षी १९ ऑक्टोबरला रेल्वे भरती होण्याच्या आधी बिहारमधून आलेल्या उमेदवारांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली. तो विषय देशभर गाजला. याचा फायदा राज ठाकरे यांना मिळाला होता आणि २००९ च्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे १३ उमेदवार निवडून आले होते.

डिसेंबर २०१८ मध्ये उत्तर भारतीय महापंचायत कार्यक्रमात विनय दुबे यांनी राज ठाकरे यांना बोलावले होते. त्या मेळाव्याला राज ठाकरे गेले मात्र त्या ठिकाणी त्यांनी, तुम्ही ज्या राज्यातून आला त्या ठिकाणी विकास का झाला नाही? हा प्रश्न तुम्ही तुमच्या राजकारण्यांना विचारला पाहिजे. अन्य राज्यांमध्ये जेव्हा तुमचा अपमान होतो तेव्हा तुमचे रक्त का उसळत नाही? असा सवालही राज यांनी त्या महापंचायतीत केला होता. महाराष्ट्रात एवढी गर्दी झाली आहे की तुम्ही तुमच्या लोकांना इकडे येऊ नका असे सांगा. कोकण, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात आहे त्या लोकांना काम नाही. रोजगार नाही. तिथल्या उद्योगात जर स्थानिक लोकांना काम मिळाले नाही तर संघर्ष होणारच, असेही राज यांनी त्या मेळाव्यात सांगितले होते. बिहारमध्ये रोजगार मिळाले तर ते बिहारींना आधी मिळायला हवे तसेच महाराष्ट्रातील रोजगार आधी महाराष्ट्रातल्या लोकांना मिळाले पाहिजेत असे महापंचायतीत राज यांनी ठामपणे सांगितले होते. 

ही सगळी पार्श्वभूमी असताना राज ठाकरे यांना भाजपने जवळ करण्यामुळे उत्तर भारतीय मतदार कसे रिॲक्ट होतील, याचा अंदाज पडद्याआड घेतला जात असल्याचे समजते. भाजपसोबत राज ठाकरे यांनी जाण्याचे फायदे-तोटे मनसेला काय होतील, यापेक्षाही भाजपला उत्तर भारतीयांकडून कसा प्रतिसाद मिळेल, हा महत्त्वाचा प्रश्न असल्याचे बोलले जाते. उत्तर भारतीय मतदार आपल्यासोबतच आहेत, असे गृहीत धरणे अडचणीचे ठरू शकते असे भाजपच्या काही नेत्यांचे म्हणणे आहे. गेल्या चार दिवसांपासून राज ठाकरे भाजपसोबत जाणार की नाही यावरून चर्चा सुरू आहेत मात्र भाजपकडून एकही नेता अधिकृतपणे यावर बोलायला तयार नाही, याचा अर्थच भाजपमध्ये अजूनही राज ठाकरे यांना सोबत घेण्याच्या फायद्या-तोट्याचे गणित मांडले जात असावे. दिल्लीतून जे ठरेल ते अंतिम. आम्ही इथे काय बोलणार? असेही काही नेत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत भाजपची भूमिका, राज ठाकरे यांना किती मतदारसंघ दिले जातात आणि ९ तारखेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे काय बोलतात, यावर पुढची राजकीय समीकरणे आणखी स्पष्ट होतील.

राजच्या केसालाही धक्का लागला तर महाराष्ट्र पेटून उठेल

  • ५ जून २०२२ रोजी राज ठाकरे यांनी अयोध्येला जाण्याची घोषणा केली होती. त्यावेळी माफी मागितल्याशिवाय राज ठाकरेंना अयोध्येत पाय ठेवू देणार नाही, अशी भूमिका बृजभूषण सिंह यांनी घेतली होती. 
  • राज ठाकरेंनी त्यावर माफी मागितली नाही. उलट मनसे पदाधिकाऱ्यांवर उत्तर प्रदेशात गुन्हे दाखल करण्याचा डाव असल्याचे सांगत त्यांनी अयोध्या दौरा रद्द केला होता. याच कालावधीत आदित्य ठाकरेदेखील अयोध्येला जाणार होते. तेव्हा बृजभूषण सिंह यांनी मनसेला इशारा देत ‘उत्तर भारतीय के सन्मान में, नेताजी मैदान में’ असे होर्डिंगही लावले होते. त्याला प्रत्युत्तर देत मनसेने मुंबईत राज ठाकरेंच्या केसालाही धक्का लागला तर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल, असे होर्डिंग लावले होते.
  • बृजभूषण समर्थकांनी उत्तर भारतीयांना अपराधी म्हणणाऱ्या राज ठाकरे यांनी आधी माफी मागावी अशी मोहीम चालवली. त्यानंतर मनसे पदाधिकाऱ्यांनीदेखील बृजभूषण सिंह मुंबईत आले तर त्यांचे पाय तोडू असा इशारा दिला होता. त्यावेळी उत्तर भारतीय आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड तणावही निर्माण झाला होता. पुढे बृजभूषण पुण्यात एका कार्यक्रमाला आले तेव्हा मनसेने कसलाही विरोध केला नाही.

Web Title: Lok Sabha Election 2024 If Raj Thackeray join hands With BJP, What Will North Indians Do?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.