शिंदे गटातील ५-६ आमदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात, लोकसभेतील पराभवानंतर एकनाथ शिंदेंना बसणार मोठा धक्का?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2024 11:55 AM2024-06-07T11:55:42+5:302024-06-07T11:56:28+5:30
Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाने लढवलेल्या १५ जागांपैकी केवळ ७ जागांवर शिंदेंचे खासदार निवडून आले आहेत. शिंदे गट या धक्क्यातून सावरत असतानाच आता एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाला मोठा धक्का देऊ शकते अशी माहिती समोर आली आहे.
दोन वर्षांपूर्वी बंडाचा झेंडा खांद्यावर घेत शिवसेनेमध्ये उभी फूट पाडणाऱ्या एकनाथ शिंदे यांना नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांनी लढवलेल्या १५ जागांपैकी केवळ ७ जागांवर शिंदेंचे खासदार निवडून आले आहेत. तर शिवसेना शिंदे गटाचा समावेश असलेल्या महायुतीचीही या निवडणुकीत मोठी पिछेहाट झाली आहे. शिंदे गट या धक्क्यातून सावरत असतानाच आता एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाला मोठा धक्का देऊ शकते अशी माहिती समोर आली आहे. लोकसभा निवडणूक आणि निकालादरम्यान, शिंदे गटातील ५ ते ६ आमदार हे उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याचा दावा करण्यात येत आहे.
लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या शिंदेसेनेमधील ५ ते ६ आमदार हे उद्धव ठाकरेंच्या संपर्कात असल्याचा दावा शिवसेनेच्या ठाकरे गटातील एका बड्या नेत्याने केला आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीने या संदर्भातील वृत्त प्रसारित केले आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान आणि निकालांनंतर हे आमदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात असल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र हे आमदार कोण आणि कुठल्या भागातील आहेत, याबाबतची माहिती समोर आलेली नाही.
नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गटाने १५ जागा लढवल्या होत्या. त्यापैकी ७ जागांवर शिंदे गटाचे उमेदवार विजयी झाले. तर आठ जागांवर त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. तसेच शिवसेना ठाकरे गटाने २१ जागा लढवल्या होत्या. त्यापैकी ९ जागांवर त्यांना विजय मिळाला. तर १२ जागांवर ठाकरे गटाला पराभूत व्हावं लागलं होतं.