"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2024 11:28 AM2024-05-08T11:28:15+5:302024-05-08T11:30:41+5:30
Loksabha Election - आदित्य ठाकरे यांनी मनसेनं भाजपाला बिनशर्त पाठिंबा दिला त्यावरून काही प्रश्न उभे केले होते. त्यावरून आता मनसेने जोरदार पलटवार केला आहे.
मुंबई - MNS Target Aaditya Thackeray ( Marathi News ) संपलेल्या पक्षावर बोलत नाही असं बोलणारे आदित्य ठाकरेमनसेवर बोलले, त्याबद्दल धन्यवाद, आता बोलायची गरज का पडली?, ईशान्य मुंबईत मराठी मते हवीत म्हणून तुम्ही गुजरातींवर बोलताय का? जिलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा ही घोषणा कुणी दिली? वरळीच्या निवडणुकीत केम छो वरळी हा बोर्ड याच आदित्य ठाकरेंनी लावला होता. आता निव्वळ मराठी माणसांची मते आपल्याला हवीत म्हणून आता गुजराती द्वेष जागा झाला का? असा पलटवार मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आदित्य ठाकरेंवर केला आहे.
संदीप देशपांडे म्हणाले की, महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाच्या जन्मापासून मराठी माणसाच्या मुद्द्यावर लढतेय. आंदोलन करतेय, रेल्वेचे आंदोलन, मराठी पाट्या आंदोलन, मराठी मुलांच्या नोकऱ्यांसाठी आंदोलन करत होतो तेव्हा उद्धव ठाकरे शेपूट घालून घरी बसले होते हे आदित्य ठाकरेंनी विसरू नये. ईशान्य मुंबईतला उबाठाकडून खोटा प्रचार केला जातोय. जर मराठी माणूस म्हणून अडवलं असते तर शिवसैनिकांनी तिथल्या तिथे कानफाडात मारली असती. मनसेने तर मारलीच असती. जर मराठी म्हणून अडवले तर कानफाडात मारायला हवी होती. तक्रारी कसल्या करताय, हे लोक षंढ आहेत असा टोला त्यांनी लगावला.
तसेच मराठी नोकरीबाबत ही जाहिरात आली त्यावरही आम्ही भूमिका घेतली, हे असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. उबाठा गटाला मराठी माणूस सोडून सर्वांची मते हवी असतात. आम्ही मतांसाठी कधी प्रतारणा केली नाही. आम्ही असल्या प्रकाराला लाथा मारल्या आहेत. धारावीच्या मोर्चाचे पुढे काय झाले?, आदित्य ठाकरे, संजय राऊत म्हणजे मराठी नाही, हे दोघे म्हणजे महाराष्ट्र नाही. या लोकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. मराठीबाबत मनसेला प्रश्न विचारण्याची नैतिकता आदित्य ठाकरेंना आहे का असा सवालही संदीप देशपांडे यांनी केला.
दरम्यान, देरासरसमोर आम्ही कोंबड्या नाचवल्या नव्हत्या. संविधानाने प्रत्येकाला अधिकार दिला कुणी काय खायचे, त्यावेळी आम्ही आंदोलन केले. जर हे आंदोलन चुकीचे होते तर उबाठाने सांगावे. मराठी माणसाला रेल्वेत नोकरी नाकारली जात होती त्यावेळी मनसेनं आंदोलन केले, ते चुकीचे होते का याचे आदित्य ठाकरेंनी उत्तर द्यावे. मनसेनं मराठी माणसांसाठी केलेले आंदोलन चुकीचे होते असं असं आदित्य ठाकरेंना वाटत असेल तर ते स्पष्ट करावे. गेल्या २५ वर्षाच्या काळात किती मराठी कंत्राटदार आणले, मुंबईतला मराठी माणूस वसई-विरार, कल्याण डोंबिवलीला फेकला याची उत्तरे आदित्य ठाकरेंना द्यावी लागतील असा टोलाही मनसेने आदित्य ठाकरेंना लगावला.