वंचितच्या नादाला लागू नका, आम्ही कपडे फाडण्यात एक्स्पर्ट; प्रकाश आंबेडकरांचा मविआला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2024 05:39 PM2024-04-10T17:39:34+5:302024-04-10T17:40:20+5:30

Loksabha Election: वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी यांच्यातील आघाडी बिघडल्यानंतर आता आरोप-प्रत्यारोप सुरू झालेत. त्यात विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या आरोपावर प्रकाश आंबेडकरांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. 

Lok Sabha Election 2024 - Prakash Ambedkar criticizes Congress leader Vijay Wadettiwar, warns Mahavikas Aghadi | वंचितच्या नादाला लागू नका, आम्ही कपडे फाडण्यात एक्स्पर्ट; प्रकाश आंबेडकरांचा मविआला इशारा

वंचितच्या नादाला लागू नका, आम्ही कपडे फाडण्यात एक्स्पर्ट; प्रकाश आंबेडकरांचा मविआला इशारा

मुंबई - Prakash Ambedkar on Mahavikas Aghadi ( Marathi News ) महाविकास आघाडीसोबत बोलणी फिस्कटल्यानंतर वंचित बहुजन आघाडीनं स्वतंत्र निवडणूक लढण्याचा मार्ग स्वीकारला. वंचितकडून विविध मतदारसंघात उमेदवार उतरवण्यात आले. त्यानंतर मविआ नेत्यांनी प्रकाश आंबेडकरांवर टीका सुरू केली. वंचित बहुजन आघाडीला पाहिजे तेवढा हुंडा न मिळाल्याने ते मविआत आले नाहीत असं विधान काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केले होते. त्यावर प्रकाश आंबेडकरांनी पलटवार करत महाविकास आघाडीला इशारा दिला आहे.

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, निवडणुकांमध्ये जागांचा समझोता होता. आपण बघू शकतो की, कालपर्यंत महाविकास आघाडीचे जागावाटप झाले नव्हते. त्यामुळे अशा लोकांनी हुंड्याची चर्चाच करू नये. आम्ही काढायला गेलो की इतर जणांना सार्वजनिक फिरायला कठीण जाईल. माझ्या आणि वंचित बहुजन आघाडीच्या नादी लागू नका, आम्ही कपडे फाडण्यात एक्सपर्ट आहोत असं त्यांनी म्हटलं. 

मनसेच्या पाठिंब्यामुळे उत्तर भारतीय असुरक्षित

मुंबईसारख्या शहरात मनसे किंवा शिवसेना यांनी अगोदर आंदोलन उभे केले होते. ते म्हणजे लुंगी हटाव, पुंगी बजाव. त्यानंतर उत्तर भारतीयांच्या विरोधातले आंदोलन उभे केले. मनसेने धारावी या ठिकाणी छ्ट पूजेला विरोध केला आणि बिहारमधील लोकांना मारले. मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी भाजपा आणि मोदींना पाठिंबा दिला. त्यामुळे बिहारमधील कार्यकर्ते जे मुंबईमध्ये राहतात आणि जे दक्षिणेतील जे कार्यकर्ते आहे. ज्यांना भाजप जवळची वाटत होती त्यांना असुरक्षित वाटू लागले असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. तसेच मुंबईचे उमेदवार आम्ही जाणीवपूर्वक जाहीर केले नाहीत. त्याचे कारण की, निवडणूक सुरू झाल्यानंतर मनसेचा पाठिंबा भाजपवाले घेतील. ते झालं की, मुंबईमधील पूर्ण गणित बदलते त्यासाठी आम्ही थांबलो होतो. उद्या संध्याकाळपर्यंत आम्ही मुंबईमधील उमेदवार जाहीर करणार असल्याचेही आंबेडकर म्हणाले.

लवकरच विशाल पाटील निर्णय घेतील

सांगलीमध्ये शिवसेनेचे काहीच नव्हतं, पण शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी मिळून ती जागा घेतली. आज सकाळीच विशाल पाटील यांचे बंधू प्रतीक पाटील यांनी माझी भेट घेतली आणि चर्चाही केली. लवकरच विशाल पाटील निर्णय घेतील, अशी अपेक्षा आम्ही बाळगत असल्याचे प्रकाश आंबेडकरांनी पत्रकार परिषदेत म्हटलं. 
 

Web Title: Lok Sabha Election 2024 - Prakash Ambedkar criticizes Congress leader Vijay Wadettiwar, warns Mahavikas Aghadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.