संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2024 12:35 PM2024-05-04T12:35:12+5:302024-05-04T12:37:37+5:30
Loksabha Election - प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे-नरेंद्र मोदी हे पुन्हा एकत्र येऊ शकतात असं विधान केल्यानंतर संजय राऊतांनी आंबेडकरांना प्रत्युत्तर केले आहे.
मुंबई - Sanjay Raut on Prakash Ambedkar ( Marathi News ) निवडणूक झाल्यावर उद्धव ठाकरे आणि मोदींचे कधीही जुळू शकते, उद्धव ठाकरे केवळ मुस्लीम मतांसाठी काँग्रेससोबत आहेत असं विधान प्रकाश आंबेडकरांनी केले होते. त्यावरून आता खासदार संजय राऊतांनीप्रकाश आंबेडकरांवर पलटवार करत त्यांच्यावर महिलेचा अपमान करत असल्याची बोचरी टीका केली आहे.
संजय राऊत म्हणाले की, प्रकाश आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडून आणावेत. दुसऱ्यांकडून आम्हाला उमेदवार घेऊन आमचे म्हणून आम्हाला मिरवावे लागत नाहीत. आमचे स्वत:चे उमेदवार आहेत. कल्याण मतदारसंघात एक गृहिणी हा तिचा अपमान आहे. एक गृहिणी महिला दहशतवादाविरोधात उभी आहे. तिला प्रकाश आंबेडकरांनी पाठिंबा द्यायला पाहिजे होता असं त्यांनी सांगितले.
परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने त्या महिलेला निवडणूक लढण्याचा अधिकार दिला आहे. दहशतवादाविरोधात ती उभी आहे. प्रकाश आंबेडकर जर अशाप्रकारे त्या महिलेचा अपमान करत असतील ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचे दुर्दैव आहे असा निशाणा संजय राऊतांनी प्रकाश आंबेडकरांवर साधला.
काय म्हणाले होते प्रकाश आंबेडकर?
महाराष्ट्रातील मुस्लिमांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, उद्धव ठाकरे हे मुस्लीम मते मिळावीत यासाठी काँग्रेससोबत आहेत. निवडणूक संपली, जिंकून आले तर ते नरेंद्र मोदींचं वाक्य सूचक आहे. या लोकांचे पुन्हा जुळेल अशी शक्यता आहे. म्हणून एकनाथ शिंदेंच्या मुलाविरोधात मी जी कल्याणमध्ये चर्चा ऐकतोय, तिथे अत्यंत कमकुवत उमेदवार दिलाय असं सांगत प्रकाश आंबेडकरांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.