उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2024 08:14 AM2024-05-04T08:14:07+5:302024-05-04T08:16:21+5:30
पंतप्रधान मोदींच्या या विधानानंतर शुक्रवारी आरोप प्रत्यारोप रंगले. मोदी आज माझी स्तुती करत आहेत पण जेव्हा आजारी होतो तेव्हा माझे सरकार पाडले, सत्तेसाठी कटकारस्थान केले.
मुंबई : उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना जेव्हा आजारी होते तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी नियमितपणे रश्मी ठाकरे यांना फोन करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करायचे. एवढेच नव्हे तर शस्त्रक्रिया करण्याबाबत उद्धव यांनी मोदींचा सल्ला घेतला होता अशी बाब आता समोर आली आहे. त्यावरून आता जोरदार राजकीय टोलेबाजी सुरू झाली आहे.
मोदी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी त्यावेळी उद्धव यांची विचारपूस कशी केली हे सांगितले. एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा आमच्याकडे जास्त आमदार होते, पण सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री करण्याचे बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करायचे होते म्हणून आम्ही शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची संधी दिली. बाळासाहेब ठाकरे यांना वाहिलेली माझी ही खरी श्रद्धांजली आहे अशी भावना मोदी यांनी या मुलाखतीत व्यक्त केली. भविष्यात त्यांना संकट येईल तेव्हा मदत करणारा मीच पहिला असेल असेही मोदी म्हणाले.
पंतप्रधान मोदींच्या या विधानानंतर शुक्रवारी आरोप प्रत्यारोप रंगले. मोदी आज माझी स्तुती करत आहेत पण जेव्हा आजारी होतो तेव्हा माझे सरकार पाडले, सत्तेसाठी कटकारस्थान केले. आज माझी शिवसेना नकली असल्याची टीका ते करत आहेत असा प्रतिहल्ला उद्धव ठाकरे यांनी केला.
ठाकरेंसाठी दार उघडण्याचे संकेत दिल्याची चर्चा
मोदींनी ऐन प्रचारकाळात अशी विधाने करून उद्धव ठाकरे यांच्यासाठी दार उघडण्याचे संकेत दिले आहेत का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, उद्धव ठाकरे आमचे शत्रू नाहीत ते विरोधक आहेत. मोदींनी आम्हाला हेच शिकवले आहे. मात्र, त्याच मुलाखतीत मोदी यांनी ज्या ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार सोडले त्यांच्यासोबत जाण्याचा प्रश्नच नाही असेही स्पष्ट केले आहे याकडे फडणवीस यांनी लक्ष वेधले.
उद्धवसेनेचे नेते संजय राऊत म्हणाले की, मोदींनी कितीही दरवाजे उघडले तरी आम्ही त्यांच्या दरवाजावर आता कधीही जाणार नाही.
राजकारणात कधी काय होईल ते सांगता येत नाही. आजचा मित्र उद्याचा शत्रू तर आजचा शत्रू उद्याचा मित्र होऊ शकतो, अशी टिप्पणी मंत्री छगन भुजबळ यांनी केली.