भाजपच्या गर्वाच्या फुग्याला टाचणी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2024 11:20 AM2024-06-11T11:20:22+5:302024-06-11T11:20:53+5:30

Maharashtra Lok Sabha Election 2024 Result: भाजपचा पराभव होणार, हे आमचे म्हणणे अखेर खरे ठरले. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना महाराष्ट्रातल्या जनतेने आपल्या कुटुंबातील सदस्य म्हणून स्थान दिले आणि त्यांनीही महाराष्ट्रातल्या जनतेचे मन जाणले हेच सत्य आहे. महाराष्ट्र ही भावनिक भूमी आहे. इथे भावनांना अधिक महत्त्व दिले जाते.

Lok Sabha Election 2024 Result: Blow the balloon of BJP's pride | भाजपच्या गर्वाच्या फुग्याला टाचणी

भाजपच्या गर्वाच्या फुग्याला टाचणी

- ॲड. हर्षल प्रधान
(प्रवक्ते, उद्धवसेना) 

भाजपचा पराभव होणार, हे आमचे म्हणणे अखेर खरे ठरले. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना महाराष्ट्रातल्या जनतेने आपल्या कुटुंबातील सदस्य म्हणून स्थान दिले आणि त्यांनीही महाराष्ट्रातल्या जनतेचे मन जाणले हेच सत्य आहे. महाराष्ट्र ही भावनिक भूमी आहे. इथे भावनांना अधिक महत्त्व दिले जाते. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना नकली संतान म्हणणाऱ्यांना धडा शिकवायलाच हवा, या निश्चयाने महाराष्ट्रातील मतदार मतदान करण्यास उत्सुक होते. 

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदावर असताना कोरोनाच्या संकटावर मात करताना, मुंबई-महाराष्ट्रातील जनतेला आपल्या नियोजनबद्ध कामगिरीचा आणि प्रशासनावरील वचक कसा असावा याचा परिचय करून दिला. संकट काळात राज्याच्या प्रमुखाने कसे वागावे, सर्वसमावेशक धोरणे कशी राबवावित याचे उदाहरण रेखाटले. मुंबईतील धारावी, वरळी या वस्त्यांमधील जनता ही कोरोनाच्या काळात किती शिस्तबद्ध नियोजनाने वावरत होती हे जगाने पाहिले आणि त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे जगभरात कौतुकही झाले होते. राज्यातील जनतेने याच काळात उद्धव ठाकरे यांना आपल्या परिवारात सामावून घेतले होते. त्यामुळे त्यांच्या बाबतीत भाजपने केलेले राजकारण, त्यांचा पक्ष फोडण्याचे, पक्षाचे नाव - चिन्ह काढून घेण्याचे केलेले घृणास्पद कारस्थान महाराष्ट्रातल्या जनतेला रुचले नाही. 

तसेही भाजपच्या विरोधात मुंबई-महाराष्ट्रात वातावरण होतेच. ठाणे, पालघर आणि कोकण पट्ट्यातील निकाल निश्चितच अनाकलनीय आणि दुःख देणारे आहेत. त्यास कारणीभूत ठरलेल्या घटकांचे  विश्लेषण आणि परीक्षण पक्षांतर्गत बैठकीत निश्चितपणे केले जाईल.  

     मुंबई ही हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचीच होती आहे आणि राहणार यावर उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले. 
     ठाणे, पालघर आणि 
कोकण पट्ट्यातील निकाल निश्चितच अनाकलनीय आणि दुःख देणारे आहेत.
     भाजपला या निकालांनी मात्र ‘गर्वाचे घर खाली’ या म्हणीचा अर्थ निश्चित कळला असावा.
     मतदारांनी भाजपचे गर्वहरण करण्याचे ठरवले होतेच आणि तेच या निकालातून स्पष्ट झाले.
     उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार हेच महाराष्ट्रातील असली नेते आहेत हेच जनतेने 
या निकालांनी अधोरेखित केले हे स्पष्ट आहे.  

लढाऊ वृत्ती भावली
उद्धव ठाकरे यांच्याप्रति असणारी सहानुभूतीची लाट जाणवत होती. त्यात उद्धव यांची विनम्रता, सच्चाई आणि सर्वस्व हरपूनही जिद्दीने लढण्याची वृत्ती जनतेला भावली आणि म्हणूनच  उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्रातील जनतेने मनापासून पाठिंबा देत भाजपचा गर्वाचा वारू रोखण्यात उद्धव यांना साथ देत महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. 

Web Title: Lok Sabha Election 2024 Result: Blow the balloon of BJP's pride

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.