एकमेकांची उणीदुणी काढू नका, विधानसभेच्या तयारीला लागा, फडणवीसांनी कान टोचले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2024 08:11 AM2024-06-09T08:11:26+5:302024-06-09T08:12:41+5:30
Maharashtra Lok Sabha Election 2024 Result: निवडणुकीत जय-पराजय होतच असतात, पण पराभवानंतर त्याचे खापर एकमेकांवर फोडायचे नसते. सगळ्यांनी जबाबदारीने आणि एकमेकांच्या सुरात बोलले पाहिजे, ही वेळ आता एकमेकांची उणीदुणी काढण्याची नाही. एकमेकांना सोबत घेऊन पुढे जाणे महत्त्वाचे आहे
मुंबई - निवडणुकीत जय-पराजय होतच असतात, पण पराभवानंतर त्याचे खापर एकमेकांवर फोडायचे नसते. सगळ्यांनी जबाबदारीने आणि एकमेकांच्या सुरात बोलले पाहिजे, ही वेळ आता एकमेकांची उणीदुणी काढण्याची नाही. एकमेकांना सोबत घेऊन पुढे जाणे महत्त्वाचे आहे. यासंदर्भात आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशीही बोलणे झाले आहे, अशा शब्दांत आमदार व पदाधिकाऱ्यांचे कान टोचतानाच महाराष्ट्रामध्ये पुन्हा महायुतीचा झेंडा फडकत नाही तोपर्यंत मी थांबणार नाही आणि तुम्हीही थांबू नका, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
लोकसभा निवडणुकीत महायुतीला महाराष्ट्रात पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवाचे विश्लेषण करण्यासाठी शनिवारी दादर येथे भाजप विधिमंडळ गटाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, विधान परिषदेतील गटनेते प्रवीण दरेकर, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह भाजपाचे मंत्री, नेते, आमदार व पदाधिकारी उपस्थित होते.
पंतप्रधान मोदी यांच्या अभिनंदनाचा ठराव
- पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याप्रमाणेच तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान होत आहेत.
- याबाबत भाजप विधिमंडळ गटाकडून नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडण्यात आला.
चार पक्षांशी लढलो
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत आम्ही तीन पक्षांशी नव्हे तर चार पक्षांशी लढत होतो. तो चौथा पक्ष म्हणजे अपप्रचार होता. हा खोटा प्रचार आपल्या लक्षात आला नाही. त्यामुळे आपण त्याला रोखू शकलो नाही. भाजप संविधान बदलणार, महाराष्ट्रातले उद्योगधंदे इतर राज्यात पळवले गेले, भाजप मराठा आरक्षणाविरोधी आहे, असा खोटा प्रचार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
दोन वेळा आपण मराठ्यांना आरक्षण दिले, मात्र ज्यांनी १९८० पासून मराठा आरक्षणाला विरोध केला त्यांच्याकडे मराठा समाजाची मते गेली. आपण मराठा विरोधी आहोत, असा खोटा प्रचार करण्यात विरोधक यशस्वी झाले.
उद्धव ठाकरेंच्या काळात महाराष्ट्र गुंतवणुकीत खाली होता. यावर्षी अशी परिस्थिती अशी आहे की, गुजरात, कर्नाटक दिल्ली यांची एकत्रित बेरीज केली तरी त्यापेक्षा जास्त गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे, असाही खुलासा त्यांनी केला.
योग्य वेळी योग्य गोष्टी करू
निवडणुकीचा निकाल लागताच मी दुसऱ्या दिवसापासून कामाला लागलोय. एक मिनिटही मी शांत बसणार नाही. आता मी काम करत आहे. करणार आहे, असं सांगतानाच 'योग्य वेळी योग्य गोष्टी करू', असे सूचक वक्तव्य फडणवीस यांनी केले.