मुंबई, कोकणपट्ट्यात महायुतीच ठरली भारी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2024 11:00 AM2024-06-11T11:00:12+5:302024-06-11T11:00:50+5:30

Maharashtra Lok Sabha Election 2024 Result: मुंबई, ठाणे, कोकण या पट्ट्यात भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीने महाविकास आघाडीपेक्षा चांगली कामगिरी करत अनेक प्रचलित राजकीय समीकरणे, ठोकताळे मोडीत काढले आहेत. मुंबई महानगरात महायुतीने सहापैकी दोनच जागा जिंकल्या असल्या तरी महायुतीची मते मविआपेक्षा दोन लाखांनी जास्त आहेत.

Lok Sabha Election 2024 Result: In Mumbai, Konkanpatty, the Maha-Uyati was the dominant party | मुंबई, कोकणपट्ट्यात महायुतीच ठरली भारी

मुंबई, कोकणपट्ट्यात महायुतीच ठरली भारी

- केशव उपाध्ये
मुंबई, ठाणे, कोकण या पट्ट्यात भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीने महाविकास आघाडीपेक्षा चांगली कामगिरी करत अनेक प्रचलित राजकीय समीकरणे, ठोकताळे मोडीत काढले आहेत. मुंबई महानगरात महायुतीने सहापैकी दोनच जागा जिंकल्या असल्या तरी महायुतीची मते मविआपेक्षा दोन लाखांनी जास्त आहेत. मुंबईत उध्दवसेना, काँग्रेस एकत्र आल्याने आणि त्यांना फतव्यांचा आशीर्वाद मिळाल्याने, संविधान बदलाचा अपप्रचार झाल्याने महायुतीच्या कामगिरीवर काही अंशी परिणाम होणार हे अपेक्षित होते. 

उत्तर मध्य मतदारसंघातील ॲड. उज्वल निकम आणि ईशान्य मुंबईमधील मिहीर कोटेचा या महायुतीच्या उमेदवारांना वीस हजारांपेक्षा कमी मताधिक्याने पराभव स्वीकारावा लागला. लोकसभा निवडणुकीचा विचार करता वीस हजार हे मोठे मताधिक्य नव्हे. या दोन्ही मतदारसंघांची सामाजिक रचना लक्षात घेता व संविधान बदलाचा प्रचार, मुल्ला-मौलवींकडून, धार्मिक स्थळांमधून निघालेले फतवे या पार्श्वभूमीवर ॲड. निकम आणि कोटेचा हे निसटत्या मतांनी पराभूत झाले. रत्नागिरी - सिंधुदूर्ग मतदारसंघात उध्दवसेनेने सारी ताकद पणाला लावली. तिते नारायण राणे यांनी दणदणीत विजय मिळवला. शेजारच्या रायगड मतदारसंघातही राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ८० हजारांपेक्षा अधिक मतांनी विजय मिळवला. शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा कोकणातील चाकरमानी एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्त्वाला पसंती देतो आहे, असाच निष्कर्ष या निकालातून निघतो.  

     रायगड मतदारसंघात  महाविकास आघाडीला शेतकरी कामगार पक्षाची साथ होती. तरीही महायुतीने सहज विजय मिळवला. 
     मावळ मतदारसंघातील  पनवेल आणि कर्जत या रायगड जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांमध्येही शिवसेना - महायुतीचे श्रीरंग बारणे यांना मताधिक्य मिळाले आहे.
     याचा अर्थ स्पष्ट आहे तो  म्हणजे कोकणपट्ट्याने शिवसेना असली शिवसेना आहे, असा कौल दिला आहे. 
     अनेक प्रयत्न करूनही उध्दवसेनेचा मतांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न यशस्वी होऊ शकला नाही, हा या निकालाचा अन्वयार्थ आहे.

मोदींवरच विश्वास
उध्दवसेनेकडून मराठी - गुजराती वाद पेटवला गेला. गुजराती उमेदवारांना मतदान करू नका, अशा प्रकारचे आवाहन समाजमाध्यमातून केले गेले. अनेक प्रकारच्या अफवा पसरवल्या गेल्या. तरीही मतदारांनी कोणतेही धार्मिक, भाषिक वाद लक्षात न घेता नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वावर विश्वास दर्शवला. 

Web Title: Lok Sabha Election 2024 Result: In Mumbai, Konkanpatty, the Maha-Uyati was the dominant party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.