Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2024 10:01 PM2024-05-05T22:01:57+5:302024-05-05T22:03:31+5:30
Sharad Pawar Health Update, Lok Sabha Election 2024 Baramati: बारामतीच्या सभेत घसा बसल्याचा उल्लेख करत त्यांनी अवघ्या सात मिनिटांतच आटोपले होते भाषण
Sharad Pawar Health Update, Lok Sabha Election 2024 Baramati: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. शरद पवार यांना तब्येतीच्या कारणास्तव सोमवारचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द केल्याचे सांगितले जात आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात आज दिवसभरात त्यांच्या सभा होत्या. उद्यादेखील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या अनेक सभा आणि अनेक नियोजित कार्यक्रम होणार होते. परंतु प्रकृती अस्वस्थ्यामुळे शरद पवार यांचे सोमवारचे सर्व कार्यक्रम रद्द केले गेले आहेत. शरद पवार हे त्यांच्या घरीच आहेत. बारामतीतील सभेतच त्यांचा घसा बसला होता. घसा बसल्याचा उल्लेख भाषणात करत त्यांनी अवघ्या सात मिनिटांतच भाषण आटोपले होते.
बारामतीच्या सभेत शरद पवारांनी मोजके भाषण केले. त्यावेळी ते म्हणाले, "आज सर्वत्र पाणी,शेती,बेकारीचा प्रश्न आहे. मात्र, सत्ताधाऱ्यांकडून या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सत्तेचा वापर होताना दिसून येत नाही.यासाठी वेगळा निकाल हाती घेण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे देशाला नवीन दिशा देण्याचे काम केले जाईल. त्यामुळे ही निवडणूक महत्वाची आहे. बारामतीची निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे. या निवडणुकीकडे संपूर्ण जगाचं लक्ष आहे. या निवडणुकीत महाराष्ट्राच्या हिताचाच निकाल होईल. अनेक वर्ष शेवटची सभा मिशनच्या ग्राउंडवर होत असे. मात्र, यंदा राज्यातील सत्ताधाऱ्यांनी ती जागा ताब्यात घेतल्याने आपल्याला ती मिळाली नाही. कोणी जागा अडविली तरी नुकसान होऊ शकत नाही, हे आजच्या सभेतील गर्दीने सिद्ध झाले आहे."
शरद पवार तुमच्या पाठीशी कायम उभा राहील..!#SharadPawar#Saheb#Indapur#Baramati#Tutaripic.twitter.com/Dnt2TRCHHE
— Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar (@NCPspeaks) May 5, 2024
सुप्रिया सुळेंची अजित पवारांवर टीका
"मी बारामतीची लेक आहे. मुलांप्रमाणे मुलींनादेखील अधिकार आहेत. आमचे दिवस मोजू नका, १८ वर्ष तुम्ही पालकमंत्री होतात, इतर तालुक्यात किती वेळा गेलात? काहीजण म्हणतात समोरचे भावूक होतील, शेवटची निवडणूक असल्याचे सांगतील, रडतील मात्र, त्यांना माझे सांगणे आहे की शेवटची की काय तो निर्णय माझा पांडुरंग घेईल. तुमच्यासारखे आमचे बुरसटलेले विचार नाहीत. सर्वसामान्य जनता आमच्याबरोबर असेपर्यंत आमचं कोणी काही करु शकणार नाही", अशी टीका सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्यावर केली.