लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2024 10:33 AM2024-05-07T10:33:03+5:302024-05-07T10:34:28+5:30
Baramati loksabha election - बारामती मतदारसंघात यंदा सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात लढत होत असून सुप्रिया सुळेंच्या बाजूने शरद पवारांसह संपूर्ण कुटुंब उतरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
बारामती - Sharad Pawar Voting ( Marathi News ) लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज पार पडतंय. या टप्प्यातील बारामती मतदारसंघातील निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. बारामतीत यंदा पवार कुटुंबातील सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात लढत होत आहे. सुनेत्रा पवार यांना महायुतीने तर सुप्रिया सुळेंना मविआकडून उमेदवारी मिळाली आहे. बारामतीची ही लढत शरद पवार आणि अजित पवारांच्या प्रतिष्ठेची आहे. त्यामुळे या मतदारसंघात प्रत्येक मत मोलाचं बनलं आहे.
बारामतीच्या अटीतटीच्या लढाईत शरद पवारांनीही लेकीसाठी मुंबईतील मतदार यादीतून नाव वगळून बारामतीचे मतदार बनले आहेत. बारामतीतील गोविंद बाग येथे शरद पवार आणि कुटुंब वास्तव्यास असतात. यंदाच्या निवडणुकीत पवारांनी बारामतीत मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे. माळेगावच्या जिल्हा परिषद शाळेत शरद पवारांसह कुटुंबाने मतदान केले. प्रतिभा पवार, सुप्रिया सुळेंचे पती सदानंद सुळे, मुलगी रेवती सुळे, मुलगा विजय सुळे यांनीही बारामतीत मतदानाचा हक्क बजावला.
आतापर्यंत शरद पवारांसह इतर कुटुंबीय सदस्य मुंबईत मतदान करत होते. मुंबईतल्या महालक्ष्मी येथील वार्ड क्रमांक २१४ येथे शरद पवार, रेवती सुळे, सदानंद सुळे यांचा मतदार यादीत समावेश होता. मात्र यंदा हे सर्व बारामतीत सुप्रिया सुळेंसाठी मतदान करणार आहेत. २०१९ पर्यंत शरद पवारांचं सिल्व्हर ओक निवासस्थान पत्ता असलेले मतदान कार्ड होते. त्यांनी आतापर्यंत निवडणुकीत मुंबईत मतदान केले आहे. आता पुन्हा ते बारामतीचे मतदार बनले आहेत. काही वर्षापूर्वी शरद पवारांनी बीसीसीआयच्या निवडणुकीसाठी आपले मतदान कार्ड बारामतीतून मुंबईत बदलून घेतले होते आणि आता लेकीसाठी पुन्हा मुंबईतून बारामतीत गेले आहेत.
ही आहे पवार कुटुंबाच्या मतदानाची यादी
शरद पवार
प्रतिभा पवार
सदानंद सुळे
रेवती सुळे
विजय सुळे
रणजित दिनकरराव पवार
अभिजीत पवार
प्रतापराव गोविंदराव पवार
शांतिशिला वसंतराव पवार
मिनाश्री माधवराव पवार
भारती प्रतापराव पवार
शुभांगी रणजित पवार