पहिली दक्षिण मुंबई तर दुसरी जागा ग्रामीण भागात..; महायुतीत मनसेला मिळणार २ जागा?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2024 04:05 PM2024-03-19T16:05:28+5:302024-03-19T16:09:49+5:30
अमित शाह आणि राज ठाकरेंच्या भेटीनंतर आता मनसेला महायुतीत २ जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुंबई - MNS In Mahayuti ( Marathi News ) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे दिल्लीच्या दौऱ्यावर असून त्यांनी आज भाजपाचे नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत मनसे-भाजपा युतीवर जवळपास ३० मिनिटे चर्चा झाली. सोमवारी रात्री उशिरा राज दिल्लीत पोहचले होते. त्यानंतर मंगळवारी झालेल्या या भेटीनंतर मनसेचा महायुतीत समावेश निश्चित झाल्याचं बोललं जाते.
या भेटीनंतर आता मनसेला महायुतीत २ जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यात प्रामुख्याने मुंबईतील दक्षिण मुंबई हा मतदारसंघ मनसेला मिळेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. दक्षिण मुंबई हा मराठी बहुल भाग आहे. याठिकाणी मनसेचीही ताकद आहे. सध्या इथं अरविंद सावंत हे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार आहेत. गेल्या २ टर्मपासून ते महायुतीकडून उमेदवार होते. मात्र यावेळी ठाकरेंनी भाजपासोबत फारकत घेतल्यानंतर या भागात महायुतीचा उमेदवार कोण असेल याची चर्चा होती. त्यात आता या जागेवर मनसेचा उमेदवार महायुतीच्या माध्यमातून उतरवण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.
तर दुसरी जागा ही ग्रामीण भागातील असल्याचं पुढे आले आहे. नगर जिल्ह्यातील शिर्डी मतदारसंघात मनसेला ताकद देण्याचा महायुतीचा प्रयत्न आहे. शिर्डीतून मनसेचे बाळा नांदगावकर यांना उभं करण्याची तयारी झालेली आहे. तर दक्षिण मुंबईत उच्चशिक्षित आणि तरुण चेहरा असलेले अमित ठाकरे हे उभे राहावेत अशी भाजपाची मागणी होती. त्यामुळे या मतदारसंघात ठाकरे घराण्यातील दुसरी व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का हे पाहणे गरजेचे आहे. दक्षिण मुंबई आणि शिर्डी असे २ मतदारसंघ मनसेला देणार याबाबत झी २४ तासनं सूत्रांच्या हवाल्याने दावा केला आहे.
दरम्यान, मनसे राज ठाकरेंच्या दिल्लीवारी संजय राऊतांनी टीकास्त्र सोडले. राज ठाकरे महायुतीत गेल्याने मविआवर काही फरक पडणार नाही. दिल्लीत जाणे हा राज ठाकरेंचा अधिकार आहे. बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेल्या शिवसेनेच्या संदर्भात महाराष्ट्रावर अन्याय करणाऱ्या मोदी शाहांना मदत करू इच्छित असतील तर अशा नेत्यांची, पक्षांची राज्याच्या इतिहासात भूमिका महाराष्ट्र द्रोही अशी लिहिली जाईल. महाराष्ट्रावर, मराठी माणसांवर प्रेम आहे. ते असा निर्णय घेणार नाहीत असा निशाणा राऊतांनी राज ठाकरेंवर साधला.