Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील नेत्यांनी अन्य राज्यात करून दाखविली कमाल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2024 07:32 AM2024-06-06T07:32:23+5:302024-06-06T07:32:56+5:30

Lok Sabha Election 2024 : अविनाश पांडेंची उत्तर प्रदेशात, तर तावडेंची बिहारमध्ये महत्त्वाची भूमिका

Lok Sabha Election 2024 : The leaders of Maharashtra have done the best in other states | Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील नेत्यांनी अन्य राज्यात करून दाखविली कमाल

Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील नेत्यांनी अन्य राज्यात करून दाखविली कमाल

Lok Sabha Election 2024 : मुंबई : महाराष्ट्रातील भाजप आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी त्यांच्यावर अन्य राज्यांमध्ये सोपविलेल्या जबाबदारीला न्याय देत आपापल्या पक्षांना चांगले यश मिळवून दिले. त्यात भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, काँग्रेसचे सरचिटणीस अविनाश पांडे यांचा प्रामुख्याने समावेश आहे. त्यांनी महाराष्ट्राबाहेर करिष्मा करून दाखविला.

पांडे हे उत्तर प्रदेशचे प्रभारी आहेत. त्यांनी तिथे काँग्रेस-समाजवादी पार्टीमध्ये समन्वय राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. काँग्रेसचे पक्षसंघटन कमकुवत झालेले होते, त्याची पाचस्तरीय बांधणी सुरू केली. काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या १७ जागांवरील पक्षाचे जुने कार्यकर्ते, नेते यांच्या भेटीगाठी घेऊन त्यांना कामाला लावले. पांडे हे काँग्रेसच्या कार्यसमितीचे सदस्यदेखील आहेत. २०१४ च्या निवडणुकीतही ते उत्तर प्रदेशचे प्रभारी होते आणि तेव्हापासून ते राज्यातील काँग्रेस नेत्यांच्या संपर्कात असतात, त्याचा फायदा यावेळी झाला.

राहुल गांधी-प्रियांका गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभांना उत्तर प्रदेशात मोठी मागणी होती, त्याचे नियोजन पांडे यांनीच केले. आता २०२७ च्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने पक्षसंघटना मजबूत करण्याची मोहीम मी  १० जूनपासून सुरू करणार असल्याचे पांडे यांनी बुधवारी ‘लोकमत’ला सांगितले. २०१९ मध्ये उत्तर प्रदेशात केवळ १ जागा जिंकणाऱ्या काँग्रेसने यावेळी ६ जागा जिंकल्या. 

तिहेरी कामगिरी करण्यात मोठा वाटा 
तावडे हे बिहारमध्ये भाजपचे प्रभारी आहेत. नितीशकुमार यांना पुन्हा एनडीएसोबत आणण्यातही त्यांची भूमिका राहिलेली होती. लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी तेथील जातीय समीकरणांची जुळवाजुळव करणे, लहान मित्रपक्षांना जोडणे आणि जागावाटप सुरळीत होईल याची काळजी करणे, अशी तिहेरी कामगिरी करण्यात तावडे यांचा मोठा वाटा राहिला. 
गेल्या वेळी ३८ जागा एनडीएने बिहारमध्ये जिंकल्या होत्या, त्या यावेळी २९ पर्यंत खाली आल्या. राजद-काँग्रेस-कम्युनिस्ट आदींनी तिथे भाजप-जदयू आणि मित्रपक्षांचे संख्याबळ कमी केले. जातीय समीकरणे काही ठिकाणी  विरोधात गेली; पण उत्तर प्रदेश, महाराष्ट्राइतकी झळ बिहारमध्ये बसली नाही.

यांनीही बजावली कामगिरी
माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर हे केरळचे प्रभारी आहेत. केरळच्या इतिहासात पहिल्यांदाच या निवडणुकीत कमळ फुलले, त्रिसूरमधून अभिनेते सुरेश गोपी हे भाजपचे उमेदवार विजयी झाले.
भाजपच्या राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर या राजस्थानच्या सहप्रभारी
आहेत. तिथे गेल्या वेळपेक्षा भाजपच्या जागा १० ने कमी झाल्या. जातीय समीकरणे तसेच काँग्रेसने आरक्षण आणि संविधान
बदलाबाबत केलेला प्रचार याचा फटका बसला. 
काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस मुकुल वासनिक हे गुजरातचे काँग्रेस प्रभारी आहेत. तिथे गेल्या दोन निवडणुकांत शून्यावर असलेल्या काँग्रेसने एक जागा जिंकली.

Web Title: Lok Sabha Election 2024 : The leaders of Maharashtra have done the best in other states

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.