भाजपाचे एका यादीत बरेच पक्षी...; मविआवर आघाडी, 'मित्रां'वर कुरघोडी अन् 'शांतीत क्रांती'

By बाळकृष्ण परब | Published: March 14, 2024 09:00 PM2024-03-14T21:00:13+5:302024-03-14T21:02:27+5:30

Lok Sabha Election 2024: एकीकडे महायुतीमधील मित्रपक्षांसोबत जागावाटपाचं गुऱ्हाळ सुरू असतानाच भाजपाने काल महाराष्ट्रातील २० उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. ही उमेदवारांची यादी घोषित करताना भाजपाने पक्षामध्ये, मित्रपक्षांवर आणि विरोधी पक्षांवर निशाणे साधले आहेत. भाजपानं एकीकडे राज्यातील विरोधी पक्षांची आघाडी असलेल्या मविआवर आघाडी घेतलीच आहे, सोबतच महायुतीमध्येही कुरघोडी केली आहे. 

Lok Sabha Election 2024: The math that BJP has achieved by publishing the list of 20 candidates in Maharashtra | भाजपाचे एका यादीत बरेच पक्षी...; मविआवर आघाडी, 'मित्रां'वर कुरघोडी अन् 'शांतीत क्रांती'

भाजपाचे एका यादीत बरेच पक्षी...; मविआवर आघाडी, 'मित्रां'वर कुरघोडी अन् 'शांतीत क्रांती'

- बाळकृष्ण परब
एकीकडे महायुतीमधील मित्रपक्षांसोबत जागावाटपाचं गुऱ्हाळ सुरू असतानाच भाजपाने काल महाराष्ट्रातील २० उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या मित्रांसोबत काही जागांवर रस्सीखेच सुरू असल्याने या यादीमध्ये भाजपाने केवळ २०१९ मध्ये लढवलेल्या आणि जिंकलेल्या मतदारसंघातील उमेवादारांचीच घोषणा केली आहे. ही उमेदवारांची यादी घोषित करताना भाजपाने पक्षामध्ये, मित्रपक्षांवर आणि विरोधी पक्षांवर निशाणे साधले आहेत. भाजपानं एकीकडे राज्यातील विरोधी पक्षांची आघाडी असलेल्या मविआवर आघाडी घेतलीच आहे, सोबतच महायुतीमध्येही कुरघोडी केली आहे. 

महाराष्ट्रातील लोकसभेचे उमेदवार जाहीर करताना भाजपाने अनेक बाबतीत खबरदारी घेतल्याचं या यादीवरून दिसतंय. उमेदवारी जाहीर झाल्यावर फार कुठे नाराजी व्यक्त होणार नाही याची पुरेपूर काळजी भाजपाने घेतलीय. सोबतच महायुतीमधील मित्रपक्ष नाराज होणार नाहीत आणि त्यांच्यापर्यंत योग्य तो संदेश जाईल, याचीही खबरदारी या यादीमधून घेतलेली दिसत आहे. महाराष्ट्रातील पहिल्या २० उमेदवारांची यादी जाहीर करताना भाजपानं जवळपास पाच विद्यमान खासदारांची तिकिटं कापली आहेत. मात्र असं करताना पक्षात असंतोष निर्माण होणार नाही याची खबरदारी घेतली गेल्याचं दिसतंय. विशेष करून बीडमध्ये विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांच्याऐवजी पंकजा मुंडे यांना उमेदवारी देऊन, आता तुमचा पुढचा प्रवास दिल्लीच्या राजकारणात असेल, असे स्पष्ट संकेत पक्षाकडून त्यांना दिले गेले आहेत. पंकजा मुंडेंप्रमाणेच सुधीर मुनगंटीवार यांनाही आता दिल्लीच्या दिशेने कूच करा, असा संदेश चंद्रपूरमधून लोकसभेची उमेदवारी देऊन दिला आहे. तर अकोल्यामधून संजय धोत्रे यांना उमेदवारी नाकारताना त्यांच्या मुलाला संधी देऊन ते नाराज होणार नाहीत, याची खबरदारी घेतली गेली. पक्षाची बऱ्यापैकी ताकद असलेल्या जळगावमध्येही  भाजपाने स्मिता वाघ यांना उमेदवारी देत पुन्हा एकदा नवा चेहरा रिंगणात उतरवलाय. त्याशिवाय मुंबईत धक्कातंत्राचा वापर करताना भाजपाने  मुंबई उत्तरमधून विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांच्या जागी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांना आणि मुंबई उत्तर पूर्वमधून मनोज कोटक यांच्या जागी मिहीर कोटेचा यांना उमेदवारी दिलीय.   
 
मागच्या काही दिवसांमधील घडामोडींनंतर भाजपाने काल जाहीर केलेल्या उमेदवारी यादीमध्ये नितीन गडकरींचं नाव असणार का? याबाबत भाजपाच्या कार्यकर्त्यांसह विरोधकांनाही उत्सुकता होती. मात्र नागपूर लोकसभेबाबत कुठलाही धक्कादायक निर्णय न घेता भाजपाने इथून गडकरींना तिसऱ्यांदा संधी दिली. त्याबरोबरच गडकरी आणि मोदींमध्ये वाद असल्याच्या आणि पक्षाकडून त्यांना उमेदवारी नाकारली जाईल, या उद्धव ठाकरेंसह विरोधकांकडून करण्यात येत असलेल्या दाव्यांनाही भाजपाकडून पूर्णविराम दिला गेलाय.

भाजपानं उमेदारांची ही यादी जाहीर करताना विरोधी पक्षांच्या महाविकास आघाडीला काही ठिकाणी धक्का दिलाय. एकनाथ खडसे हे पक्ष सोडून शरद पवार यांच्यासोबत गेल्याने भाजपा यावेळी रक्षा खडसे यांना उमेदवारी देणार नाही, त्यांच्याऐवजी गिरीश महाजन किंवा अन्य कुणाला तरी उमेदवारी दिली जाईल, असे दावे करण्यात येत होते. मात्र रक्षा खडसे यांनी मागच्या दहा वर्षांत केलेलं काम आणि दाखवलेली पक्षनिष्ठा याचं 'रिटर्न गिफ्ट' म्हणून भाजपाने त्यांना पुन्हा उमेदवारी दिलीय. रक्षा खडसेंना दिलेल्या उमेदवारीमुळे भाजपाने पक्षाचे एकेकाळचे ज्येष्ठ नेते आणि आता कट्टर विरोधक बनलेल्या एकनाथ खडसे यांच्यासमोर राजकीय पेच निर्माण केला आहे. आता रक्षा खडसेंविरोधात रोहिणी खडसे यांना उतरवलं जाईल, अशी चर्चा आहे. मात्र सध्या तरी रक्षा खडसे यांच्या उमेदवारीमुळे एकनाथ खडसे द्विधा मन:स्थितीत आहेत एवढं नक्की. 

याबरोबरच भाजपाने उमेदवारी यादीमधून गटातटाचं राजकारण करणाऱ्या राज्यातील नेत्यांनाही स्पष्ट संदेश दिला आहे. ज्यांची कामगिरी चांगली आहे आणि जे नेते निवडून येऊ शकतात, अशांना गटतट न पाहता उमेदवारी दिली जाईल, हे कालच्या उमेदवारी यादीमधून भाजपाच्या पक्ष नेतृत्वाने स्पष्ट केलं आहे. नंदूरबारच्या खासदार हिना गावित, धुळ्याचे खासदार सुभाष भामरे, माढ्याचे रणजीत सिंह नाईक निंबाळकर, सांगलीचे विद्यमान खासदार संजयकाका पाटील, नांदेडचे प्रतापराव पाटील चिखलीकर यांना स्थानिक पातळीवर होत असलेल्या विरोधामुळे उमेदवारी नाकारली जाईल, असे दावे केले जात होते. मात्र या सर्वांना पक्षनेतृत्वाकडून पुन्हा संधी दिली गेली आहे. तसेच पुण्यामध्येही खासदारकीसाठी मुरलीधर मोहोळ यांना झुकतं माप देत भाजपाने आपली दिशा स्पष्ट केली आहे. 

एकीकडे पक्षांतर्गत हेवेदावे मोडीत काढताना भाजपाने महायुतीमधील मित्रपक्षांनाही सूचक संदेश दिला आहे. महायुतीच्या जागावाटपामध्ये तिढा निर्माण झालेल्या जागांवर भाजपाने उमेदवारांची घोषणा केलेली नाही. तसेच भाजपाच्या ताब्यातील काही मतदारसंघांवर जिथे मित्रपक्षांचा दावा आहे, अशा ठिकाणी उमेदवारांची घोषणा करणेही भाजपाने टाळले आहे. त्यात भंडारा-गोंदिया, गडचिरोली, सातारा आदी मतदारसंघांचा समावेश आहे. मात्र असं असलं तरी महायुतीच्या जागावाटपात भाजपा स्वत:कडे ३० पेक्षा कमी जागा घेईल, याची शक्यता कमी आहे. अशा परिस्थितीत महायुतीमधील तीन पक्षांत जागावाटप पुढे कसं सरकतं, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Web Title: Lok Sabha Election 2024: The math that BJP has achieved by publishing the list of 20 candidates in Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.