"जर राजकीय ज्ञान आणि समज नसेल, तर..."; प्रकाश आंबेडकर तुषार गांधींवर संतापले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2024 17:43 IST2024-04-12T17:41:20+5:302024-04-12T17:43:11+5:30
Loksabha Election 2024: महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत टीका केली. त्यावरून आंबेडकरांनीही थेटपणे तुषार गांधींना प्रत्युत्तर दिले आहे.

"जर राजकीय ज्ञान आणि समज नसेल, तर..."; प्रकाश आंबेडकर तुषार गांधींवर संतापले
मुंबई - Prakash Ambedkar on Tushar Gandhi ( Marathi News ) प्रकाश आंबेडकरांनी घेतलेली भूमिका भाजपाच्या फायद्याची आहे असं विधान तुषार गांधी यांनी केले होते. त्यावर प्रकाश आंबेडकरांनी संतप्त उत्तर दिलं. तुम्ही केलेले विधान अत्यंत चुकीचं, कोणताही आधार नसलेले आणि वंचित बहुजनांच्या राजकारणात अडथळा निर्माण करणारे आहे. लोकशाही आणि स्वतंत्र राजकीय नेतृत्वासाठीच्या प्रयत्नांना, तसेच वर्ग, जात- धर्माच्या पलीकडे जावून सुरू असलेल्या सर्वसमावेशक राजकारणाला नाकारणारे आहे असं प्रत्युत्तर प्रकाश आंबेडकरांनी दिलं आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, तुमच्या आजोबांची ब्रिटिशांविरुद्धची चळवळ सर्वसमावेशक होती, पण तुमचे विचार आणि राजकारणामध्ये तशी स्पष्टता दिसत नाही. महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीसोबत कसा व्यवहार केला हे तुम्हाला माहिती नाही का? त्यांचे राजकारण किती अलिप्त आहे हे तुम्हाला माहीत नाही का?. महाविकास आघाडी आणि भाजपच्या नेत्यांमध्ये झालेली तडजोड तुम्हाला माहिती नाही का? अशी कानउघडणी तुषार गांधींची केली.
त्याशिवाय जर तुमच्याकडे राजकीय ज्ञान आणि समज नसेल तर निरर्थक गोष्टी करण्यात आणि निराधार आरोप करण्यात तुमचा वेळ घालवू नका. काळच सत्य परिस्थिती समोर आणेल. खरं तर, आताच सगळे संकेत दिसत आहेत. पण, तुम्ही डोळे झाकल्यासारखे संदर्भहीन ज्याला काहीही आधार नाही असे वक्तव्य करून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करू नका असंही प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे.
काय म्हणाले होते तुषार गांधी?
प्रकाश आंबेडकरांबाबत मैत्रीभाव आहे, पण यावेळी त्यांनी स्पष्ट भूमिका घेणं गरजेचे होते. वंचितनं जबाबदारी समजायला हवी होती. स्वत:चा फायदा बाजूला ठेवून राष्ट्राचं हित पाहिलं नाही म्हणून ते टीका पात्र आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या भूमिकेचा फायदा भाजपालाच होणार आहे. वंचित आणि एमआयएमच्या मतांमुळे काँग्रेस आणि पुरोगामी पक्षांना नुकसान होणार हे स्पष्ट आहे असं तुषार गांधींनी म्हटलं होते.