पुत्रमोहातून एकनाथ शिंदेंना संपवण्याचा डाव उद्धव ठाकरेंचा होता; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2024 12:05 PM2024-04-18T12:05:28+5:302024-04-18T12:06:01+5:30
Loksabha Election - शिंदेकडील नगरविकास खाते मातोश्रीवरून चालवायचे, मंत्र्याला न विचारता अधिकाऱ्यांच्या बैठका व्हायच्या अशा प्रकारे अनेक आरोप देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर केले आहेत.
मुंबई - Devendra Fadnavis on Uddhav Thackeray ( Marathi News ) पुत्रमोहामुळे एकनाथ शिंदेना संपवण्याचा पूर्णपणे डाव होता असा घणाघाती आरोप देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर केला आहे. खुर्चीकरता उद्धव ठाकरेंनी शिवसेना पक्ष काँग्रेससोबत नेला असंही फडणवीसांनी म्हटलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, ज्याप्रकारे काँग्रेससोबत उद्धव ठाकरेंनी आपला पक्ष नेला, मुख्यमंत्री कोण होणार हे त्यांच्या पक्षात सर्वांना माहिती होतं. त्यांनी अनेकदा भाषणात म्हटलं, त्यांच्यासमोर महायुतीचा मुख्यमंत्री कोण हे बोललं गेले. परंतु खुर्चीकरता त्यांनी तडजोड केली. त्यावेळी एकनाथ शिंदेंसारख्या शिवसैनिकाला वाटलं हे काय सुरू आहे. पक्षापेक्षा पुत्रमोह मोठा आहे हे दिसून आले. त्यांना पक्षाची चिंता नाही. अशा परिस्थितीत आपलं अस्तित्व काय हा प्रश्न निर्माण झाला असं त्यांनी सांगितले. न्यूज १८ चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
तसेच पुत्रमोहातून एकनाथ शिंदेंना पूर्णपणे संपवण्याचा डावही चालला होता. कधीतरी तुम्ही एकट्यात विचारा. शिंदेंना खोट्या प्रकरणात अडकवायचे, त्यांच्याकडे असलेले खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे होते, परंतु ते विभाग दुसरं कुणी चालवायचे. मातोश्रीहून नगरविकास खाते चालत होते. पालकमंत्री मंत्र्याला न विचारता, MMRDA ची बैठक बोलवतात आणि मी पालकमंत्री आहे म्हणून बैठक घेतोय सांगितले असंही देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.
दरम्यान, आमचा सर्व्हे आमच्या उमेदवारांसाठी असतो, शिवसेनेचा उमेदवार कोण हे आम्ही ठरवत नाही. काही नेते माध्यमांच्या बातमीवर प्रतिक्रिया देतात. मी माझ्या पक्षात नेत्यांना सांगितलं आहे, नेमकं काय घडतंय हे माहिती असल्याशिवाय प्रतिक्रिया देणे टाळा. काही शिवसेना नेत्यांनी विधाने केली त्यावरही माझी नाराजी आहे. भाजपा आम्हाला दाबतेय असं म्हणतात, युतीचा धर्म असतो तो पाळला पाहिजे. आम्ही पाळतो. एकनाथ शिंदे यांनी नेहमी योग्य आणि साम्यंजस्याची भूमिका ठेवली आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.