आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2024 08:09 AM2024-05-08T08:09:59+5:302024-05-08T09:40:39+5:30
Loksabha Election - राज ठाकरे यांच्या मनसेनं भाजपाला बिनशर्त पाठिंबा दिला, त्यावरून आदित्य ठाकरेंनी मनसेला खडे बोल सुनावले असून भाजपावरही निशाणा साधला आहे.
मुंबई - Aaditya Thackeray on MNS ( Marathi News ) देरासरबाहेर मांसाहार टांगून मनसेच्या लोकांनी आंदोलन केले होते, तीच मनसे आज भाजपासोबत आहे त्यामुळे जैनसमाज भाजपासोबत राहणार का?, ज्या मनसेनं उत्तर भारतीयांना मारहाण केली त्या मनसेचा पाठिंबा भाजपाला चालतो का असा सवाल करत उबाठा गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मनसे-भाजपावर हल्लाबोल केला आहे.
आदित्य ठाकरेंनी एका मुलाखतीत म्हटलं की, मी मनसेच्या नेत्यांवर कधी बोलत नाही. ते पथ्य मी पाळतो. पण मी मनसेच्या कार्यकर्त्यांना विचारतो, तुम्ही जो भाजपाला बिनशर्त पाठिंबा दिलाय आणि त्यांच्या शिंदे गटाला दिलाय, त्याच्यात गुजराती सोसायटीबाबत जी घटना घडली, गुजरात आणि गुजराती लोकांसोबत आमचे भांडण नाही. पण इथून उद्योग उचलून तिकडे नेले जातात तेव्हा मी नडणार नाहीतर ते सर्व आमचेच आहेत. मराठी माणसाला नोकरी नाकारली, सगळे उद्योग धंदे जे गुजरातला चाललेत त्याला बिनशर्त पाठिंबा आहे का? असं त्यांनी विचारले, झी २४ तासच्या मुलाखतीत ते बोलत होते.
त्याचसोबत ज्या उत्तर भारतीयांना मनसेने एकदा नव्हे तर अनेकवेळा मारलं आहे मग त्यांचा पाठिंबा घ्यायला भाजपा तयार आहात? तसेच जर भाजपा जिंकली तर उद्योगधंदे गुजरातला जाणार, इथल्या भूमिपुत्रांना नोकरी मिळणार नाही यालाही मनसेचा पाठिंबा आहे का? असा टोलाही आदित्य ठाकरेंनी लगावला आहे.
दरम्यान, गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदींसाठी भाजपाला बिनशर्त पाठिंबा देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर निवडणुकीच्या प्रचारात पहिल्यांदाच कोकणच्या सभेत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला होता. उबाठा गटाकडून वारंवार उद्योगधंदे गुजरातला पळवले जातायेत असं म्हटलं जातं, परंतु २०१४ ते २०१९ आणि त्यानंतर २०१९ ते २०२२ या मागील १० वर्षाच्या काळात उद्धव ठाकरे साडे सात वर्ष सत्तेत होते. तेव्हा उद्योगधंदे बाहेर जातायेत ते का अडवले नाहीत असा सवाल राज ठाकरेंनी विचारला होता.