'भाजपाला चिंतनाची गरज' म्हणणाऱ्या एकनाथ खडसेंना महाजनांनी सुनावलं, म्हणाले- "तुम्ही आधी सांगा..."
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2024 06:38 PM2024-06-03T18:38:32+5:302024-06-03T18:48:12+5:30
एकनाथ खडसे यांनी भाजपला चिंतन करण्याची गरज असल्याचे म्हणताच मंत्री गिरीश महाजन यांनी प्रत्युत्तर दिलं आहे
Eknath Khadse VS Girish Mahajan : लोकसभा निवडणुकीनंतर एक्झिट पोलचे आकडे समोर आले असून अनेक निष्कर्षांमधून एनडीएला स्पष्ट बहुमत मिळेल असे अंदाज वर्तवण्यात आलाय. मात्र पंतप्रधान मोदींनी दिलेली ४०० पारची घोषणा पूर्ण होणार की नाही याबाबत अनेकांना शंका आहे. त्यामुळे विरोधकांकडून भाजपला लक्ष्य केलं जात आहे. एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्रात भाजपच्या विजयाबाबत चित्र काहीसे स्पष्ट झालेलं नाही. अशातच एक्झिट पोलच्या आकड्यांवरुन भाजप प्रवेशासाठी इच्छुक असलेल्या एकनाथ खडसे यांनी पक्षालाच कानपिचक्या दिल्या होत्या. भाजपाला फोडाफोडीच्या राजकारणाचा फटका बसल्याचं विधान एकनाथ खडसेंनी केलं होतं. त्यावर आता मंत्री गिरीश महाजन यांनी खडसेंना रोखठोक सवाल केला आहे.
एकनाथ खडसे हे गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत. खडसे यांचा अधिकृत प्रवेश झाला नसला तरी लोकसभा निवडणुकीत भाजपचे समर्थन करत होते. यावेळी भाजपला फोडाफोडीच्या राजकारणाचा फटका बसला आहे का? असा सवाल एकनाथ खडसे यांना विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना खडसे यांनी भाजपला चिंतन करण्याची गरज असल्याचे म्हटलं आहे. याबाबत आता गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया देत भाजपवर बोलण्याआधी खडसेंनी त्यांचा पक्ष कोणता हे सांगावे असे प्रत्युत्तर दिलं आहे.
काय म्हणाले एकनाथ खडसे?
लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत टीव्ही९ मराठीसोबत बोलताना एकनाथ खडसे यांनी भाजपला चिंतन करण्याची गरज असल्याचे म्हटलं. "भारतीय जनता पक्ष ज्यांनी रात्रंदिवस काम करून उभा केला, त्यांचा हा पक्ष असताना इतराच्या हातामध्ये जाणं आणि फोडाफोडीच्या राजकारणाचा हा परिणाम आहे. हे जनतेला वाटलं. त्यामुळे अजित पवार यांना या निवडणुकीत फार प्रतिसाद दिसत नाही. तसेच शिवसेना शिंदे गटालाही जास्त प्रतिसाद दिसत नाही. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला चिंता करण्याची गरज आहे,” असे एकनाथ खडसे म्हणाले होते.
गिरीश महाजनांचे प्रत्युत्तर
"त्यांना म्हणा तुम्ही आमची चिंता करु नका. तुम्ही नेमकं कोणत्या पक्षात आहात आधी ते सांगा आणि मग बोला," अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंच्या विधानावर दिली आहे.