Exit Poll : बीडमध्ये पंकजा मुंडेंकडे आघाडी तर नगरमध्ये भाजपला मोठा धक्का!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2024 07:10 PM2024-06-01T19:10:33+5:302024-06-01T19:22:58+5:30
एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार बीड आणि अहमदनगर मतदारसंघामध्ये अनपेक्षित निकाल लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Exit Poll Results 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी देशभरातील ५४३ जागांसाठी मतदान पार पडल्यानंतर आता एक्झिट पोलचे आकडेवारी समोर येण्यास सुरुवात झाली आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातल्या अनेक मतदारसंघाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे. अशातच आता एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात बीड आणि अहमदनगर लोकसभा मतदारसंघाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. बीडमध्ये शरद पवार गटाला तर नगर जिल्ह्यात भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता एक्झिट पोलच्या आकडेवारीतून समोर आलं आहे.
बीड लोकसभा मतदारसंघामधून पंकडा मुंडे बाजी मारण्याची शक्यता आहे. टीव्ही९ पोलस्ट्रॅटच्या एक्झिट पोलनुसार पंकजा मुंडे या बीडमधून बाजी मारण्याची शक्यता आहे. पंकजा मुंडे यांच्याविरोधात शरद पवार गटाचे बजरंग सोनावणे हे निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. त्यामुळे आता या एक्झिट पोलनुसार बजरंग सोनावणे यांना धक्का बसण्याची शक्यता आहे. जातीय ध्रुवीकरणामुळे हा मतदारसंघ भाजपला अवघड जाणार अशी चर्चा सुरु होती. मात्र एक्झिट पोलनुसार ही जागा भाजपला सुटताना दिसत आहे.
मराठवाड्यामध्ये सुरु असलेलं मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा या सगळ्याचा बीडमधल्या निवडणुकीवर मोठा परिणाम दिसून आला. मराठवाड्यात दोन गट पडल्याने बीडमधील निवडणूक ही चुरशीची होती. बीडमध्ये मुंडे कुटुंबियांचे असलेला दबदबा आणि महायुतीचे बळ याचा पंकजा मुंडे यांना फायदा झाल्याचे एक्झिट पोलमधून दिसून येत आहे.
दुसरीकडे, अहमदनगरमध्ये विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांना धक्का बसण्याची शक्यता आहे. टीव्ही९ पोलस्ट्रॅटच्या एक्झिट पोलनुसार महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके हे आघाडीवर आहेत. निलेश लंके हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या काही दिवसांपूर्वीच निलेश लंके हे अजित पवारांची साथ सोडून शरद पवार यांच्यासोबत गेले होते. त्यानंतर लंके यांना अहमदनगर मतदारसंघातून उमेदवारी देखील मिळाली होती. त्यानंतर आता एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार, निलेश लंके हे आघाडीवर आहेत तर भाजपचे सुजय विखे पाटील यांना धक्का बसण्याची शक्यता आहे.