नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्मला महाराष्ट्राची अपेक्षित साथ नाही !
By यदू जोशी | Published: June 2, 2024 05:34 AM2024-06-02T05:34:44+5:302024-06-02T06:25:39+5:30
Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : महायुतीची वाढली चिंता; महाविकास आघाडीला मात्र दिलाशाचा अंदाज
मुंबई : पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा संधी मिळेल, भाजपला तीनशेहून अधिक जागा मिळतील असे सर्वेक्षण वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांनी दिले असले तरी मोदींच्या या विजयात महाराष्ट्राची अपेक्षित साथ नसेल, असेही चित्र समोर आल्याने राज्यातील सत्तारुढ महायुतीची चिंता वाढली आहे.
महायुतीच्या समर्थकांना मोदी सत्तेत येत असल्याचा आनंद आहे तर महाराष्ट्रात माघारल्याचे दु:ख असणार. त्याचवेळी महाविकास आघाडीच्या समर्थकांना केंद्रात इंडिया आघाडीची कामगिरी फारशी समाधानकारक नसणार याची खंत असेल आणि महाराष्ट्रात चांगले यश मिळत असल्याचे समाधान नक्कीच असेल. राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकारणाचा विचार केला तर एक्झिट पोलने दोघांनाही कुठे ना कुठे सुखावले आहे आणि दुखावलेही आहे.
अंदाज खरे ठरले तर...
महायुतीत सर्वांत मोठा पक्ष भाजप असेल तर महाविकास आघाडीत उद्धव सेनेला सर्वाधिक जागा मिळतील. एक्झिट पोलचे अंदाज महाराष्ट्रापुरते खरे ठरले तर पाच महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मविआचे मनोबल नक्कीच वाढलेले असेल.
एक्झिट पोल प्रमाण मानले तर मोदींची देशात असलेली लाट महाराष्ट्रात नव्हती, येथे स्थानिक मुद्दे आणि जातीय समीकरणांनी बऱ्याच ठिकाणी प्रभाव टाकला असे दिसत आहे. महायुती महाविजयापासून वंचित राहणार असे चित्र आहे.
४१ प्लसचे स्वप्न दूरच?
२०१९ च्या निवडणुकीत भाजपने २३ तर एकत्रित शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. या युतीला ४१, राष्ट्रवादीला चार, काँग्रेसला एक आणि एमआयएमला एक आणि काँग्रेस-राष्ट्रवादी समर्थित एक अपक्ष अशा जागा मिळाल्या होत्या. आजच्या एक्झिट पोलच्या आधारे विश्लेषण केले तर महायुतीचे मोठे नुकसान होताना दिसत आहे. फुटलेली शिवसेना आणि फुटलेली राष्ट्रवादी यांना सोबत घेऊन ४१ चा आकडा गाठू या भाजपच्या स्वप्नांना तडे जाताना दिसत आहेत.
बारामतीत काय?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला चारपैकी एकही जागा मिळणार नाही किंवा फारतर एक किंवा जास्तीत जास्त दोन जागा मिळतील असे एक्झिट पोलने म्हटले आहे. बारामतीत सुप्रिया सुळे जिंकतील आणि सुनेत्रा पवार हरतील या निष्कर्षामुळे अजित पवार गटाची चिंता नक्कीच वाढली असेल.
पसंती मूळ पक्षांनाच?
शरद पवार आणि उद्धव ठाकरे या दोन नेत्यांना सहानुभूती मिळाल्याचे त्यांना मिळत असलेल्या जागांवरून दिसते. दोन्ही पक्षांच्या फाटाफुटीत मतदारांनी फुटून बाहेर पडलेल्यांपेक्षा मूळ पक्षांना अधिक पसंती दिल्याचेही जाणवत आहे. शिंदे आणि अजित पवारांना सोबत घेऊन भाजपचा किती फायदा झाला याचे आत्मचिंतन करावे लागणार आहे. सांगलीत काँग्रेस बंडखोर अपक्ष विशाल पाटील बाजी मारताना दिसत आहेत. काँग्रेसला यावेळी खूपच चांगले यश मिळताना दिसत आहे.
ओडिशात भाजपचा व्हाइट वॉश? २१ पैकी २१ जागांवर निर्विवाद यश मिळण्याची शक्यता
ओडिशामध्ये भाजप लोकसभेच्या २१पैकी १५ जागा जिंकेल असे भाकित एग्झिट पोलनी व्यक्त केले आहेत. या राज्यात बिजू जनता दल या पक्षाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचे सरकार असले तरी लोकसभा निवडणुकांत मतदारांची पसंती भाजपलाच राहिल असे पोलच्या निष्कर्षांत म्हटले आहे.
गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, उत्तर प्रदेश, उत्तराखंड,हिमाचल प्रदेश, दिल्ली येथे भाजप उत्तम कामगिरी करेल, दिल्लीमध्ये काँग्रेस, आपला एकही जागा जिंकणे शक्य होणार नाही असाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.