फडणवीसांचे भाषण म्हणजे केवळ घोषणांचा महापूर : बच्चू कडू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2019 05:24 PM2019-04-03T17:24:29+5:302019-04-03T17:25:33+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच भाषण ऐकलं तर असं वाटतं की, चार ही बाजूंनी नदी वाहत असून पूर आल्यासारखं वाटत. मुख्यमंत्री हे केलं ते केलं असं सांगतात की माणूस पागल होईल, अशा शब्दांत प्रहार संघटनेचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांनी मुख्यंत्र्यांची खिल्ली उडवली.
मुंबई - लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिंगेला पोहचला आहे. राजकीय नेतेमंडळी उमेदवारांसाठी सभांना हजेरी लावताना दिसत आहे. यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघाच्या अपक्ष उमेदवार वैशाली येडे यांच्या प्रचारासाठी बच्चू कडू मतदारसंघात ठीक-ठिकाणी सभा घेत आहे. मंगळवारी यवतमाळच्या अकोला बाजार येथे आपल्या भाषणातून बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समाचार घेतला. त्यांचे भाषण म्हणजे, केवळ घोषणांचा महापूर असल्याचे बच्चू कडू यांनी म्हटले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच भाषण ऐकलं तर असं वाटतं की, चार ही बाजूंनी नदी वाहत असून पूर आल्यासारखं वाटत. मुख्यमंत्री हे केलं ते केलं असं सांगतात की माणूस पागल होईल, अशा शब्दांत प्रहार संघटनेचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांनी मुख्यंत्र्यांची खिल्ली उडवली. तुम्हाला सगळ कळते तरीही मतदान कमळ आणि शिवसेनेलाच करतात असे म्हणत त्यांनी कार्यकर्त्याचे कान टोचले.
बच्चू कडू यांनी मुख्यमंत्र्यांसह नरेंद्र मोदी यांच्यावरही जोरदार टीका केली. मोदी म्हणतात पाच वर्षांत घरा-घरात स्वच्छालय बांधले, पण त्यापेक्षा जर कापसाला योग्य भाव दिला असता तर आम्ही तुमचे गुलाम झालो असतो असे म्हणत त्यांनी मोदींवर निशाना साधला. अमरावती-वाशीम मतदार संघातून प्रहार संघटनेच्या वतीने वैशाली येडे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. वैशाली येडे वर्गणीच्या जोरावर एसटी बसने प्रवास करून आपला प्रचार करत आहेत. त्यामुळे, येडे यांना मतदार किती साथ देणार हे निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे.