Lok Sabha Election Result 2024 : "...तर भाजपा स्वबळावर ३१० च्या पुढे गेली असती", फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2024 07:25 PM2024-06-04T19:25:40+5:302024-06-04T19:27:45+5:30
Lok Sabha Result 2024 : लोकसभा निवडणुकीच्या निकालावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Lok Sabha Election Result 2024 : लोकसभा निवडणूक २०२४ च्या निकालाचे चित्र जवळपास स्पष्ट होत आले आहे. राज्यात सांगली वगळता महाविकास आघाडी विरूद्ध महायुती अशी थेट लढत झाली. सत्ताधारी भाजपला या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे यश न मिळाल्याने विरोधकांना टीका करण्याची आयती संधी मिळाली. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीच्या निकालावर बोलताना विविध मुद्द्यांवर प्रकाश टाकला.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर पोस्ट करत फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, पुन्हा एकदा देशातील जनतेने एनडीएला संपूर्ण बहुमत प्रदान केले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग तिसर्यांदा भारताचे पंतप्रधान होणार आहेत. मी त्यांचे आणि देशभरातील सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो. इंडि आघाडीतील सर्व पक्ष मिळून जितक्या जागांवर आघाडीवर आहेत, त्यापेक्षा अधिक जागा एकट्या भाजपाच्या वाट्याला आल्या आहेत. शिवाय, आंध्रप्रदेशात तेलगू देसम पार्टीच्या नेतृत्त्वात भाजप युतीला, तर ओडिशात भाजपच्या नेतृत्त्वात दणदणीत यश मिळाले, या दोन्ही राज्यातील कार्यकर्त्यांचे मी अभिनंदन करतो.
तसेच उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात आमच्या काही जागा कमी आल्या. पश्चिम बंगालमध्ये अधिक चांगले यश मिळेल, असे वाटत होते. असे झाले असते, तर भारतीय जनता पार्टी स्वबळावर ३१० च्या पुढे गेली असती. देशातील जनतेने भक्कमपणे मोदींना साथ दिली आहे. संविधान बदलणार असा खोटा प्रचार करुन जागा जिंकण्याचा प्रयत्न झाला, हे या निकालाचे दुर्दैव आहे. पण, तरी निवडणुकीत जनतेचा जनादेश जसा असतो, तसाच स्वीकारायचा असतो. तो शिरसावंद्य मानायचा असतो. या निकालाचे सखोल चिंतन करुन विधानसभेत पुन्हा जनतेत जाऊन, या लोकसभेची कसर व्याजासह भरून काढू, असेही फडणवीसांनी नमूद केले.
पुन्हा एकदा देशातील जनतेने एनडीएला संपूर्ण बहुमत प्रदान केले आणि मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी सलग तिसर्यांदा भारताचे पंतप्रधान होणार आहेत.
— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) June 4, 2024
मी त्यांचे आणि देशभरातील सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो !
इंडि आघाडीतील सर्व पक्ष मिळून जितक्या जागांवर आघाडीवर आहेत, त्यापेक्षा अधिक…
"महाराष्ट्रातील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि महायुतीतील सर्वच घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांनी या निवडणुकीत प्रचंड परिश्रम घेतले आणि ते पुढेही करणार आहेत, मी त्यांचेही मन:पूर्वक आभार मानतो", अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना दाद दिली.