Lok Sabha Election Result 2024 : घराण्याच्या राजकारणाला मिळाले संमिश्र यश; दिग्गजांना धक्का तर काहींना मतदारांनी तारले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2024 05:57 AM2024-06-05T05:57:56+5:302024-06-05T05:58:25+5:30

Lok Sabha Election Result 2024 : भाजपचे ज्येष्ठ नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा यादेखील पराभूत झाल्या.

Lok Sabha Election Result 2024 : Family politics gets mixed success; Veterans were shocked and some were saved by the voters | Lok Sabha Election Result 2024 : घराण्याच्या राजकारणाला मिळाले संमिश्र यश; दिग्गजांना धक्का तर काहींना मतदारांनी तारले

Lok Sabha Election Result 2024 : घराण्याच्या राजकारणाला मिळाले संमिश्र यश; दिग्गजांना धक्का तर काहींना मतदारांनी तारले

Lok Sabha Election Result 2024 : मुंबई : घराणेशाही किंवा राजकारणाची कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना संमिश्र यश मिळाले. काही दिग्गजांना धक्का बसला तर काहींना मतदारांनी तारले. मोहिते पाटील घराण्याने माढ्यात विजय मिळवत प्रभुत्व सिद्ध केले. भाजपचे ज्येष्ठ नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा यादेखील पराभूत झाल्या. पवार घराण्यातील कन्या जिंकली, सून हरली.

माजी खासदार दिवंगत बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा यांनी चंद्रपुरात एकतर्फी विजय मिळविला. रवी राणा यांच्या पत्नी नवनीत राणा यांचा अमरावतीत पराभव झाला. माजी खासदार संजय धोत्रे यांचे पुत्र अनुप धोत्रे (भाजप) अकोल्यातून जिंकले; पण, हिंगोलीचे खासदार राहिलेले हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री या यवतमाळ-वाशिममधून पराभूत झाल्या. डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या स्नुषा अर्चना पाटील उस्मानाबादमधून हरल्या.

मतदारांनी कुणाला स्वीकारले?
कोल्हापुरात काँग्रेसचे शाहू छत्रपती तर साताऱ्यात भाजपचे उदयनराजे भोसले यांनी विजय मिळविला. माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील सांगलीत विजयी झाले. माढामधून जिंकलेले धैर्यशील मोहिते (शरद पवार गट) हे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे आहेत. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती जिंकल्या.

भाजपचे ज्येष्ठ नेते दिवंगत वेदप्रकाश व दिवंगत चंद्रकांता गोयल यांचे पुत्र व केंद्रीय मंत्री पीयूष गोयल उत्तर मुंबईत सहज जिंकले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत यांचा कल्याणमध्ये सहज विजय झाला. रावेरमध्ये एकनाथ खडसे यांच्या स्नुषा रक्षा यांनी दणदणीत विजय मिळविला. जळगावात जिंकलेल्या स्मिता वाघ (भाजप) यांचे पती दिवंगत उदय वाघ हे पक्षाचे प्रमुख नेते होते. 

आणखी काही निकाल...
दिंडोरीमध्ये माजी मंत्री दिवंगत ए.टी. पवार यांच्या स्नुषा डॉ. भारती पवार यांचा पराभव झाला. नंदुरबारमध्ये मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या कन्या डॉ. हीना यांचा पराभव झाला. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र डॉ. सुजय विखे हरले. पालघरमध्ये माजी मंत्री दिवंगत विष्णू सावरा यांचे पुत्र डॉ. हेमंत (भाजप) यांनी विजय मिळविला. 

Web Title: Lok Sabha Election Result 2024 : Family politics gets mixed success; Veterans were shocked and some were saved by the voters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.