नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींकडे दिला पंतप्रधानपदाचा राजीनामा, लोकसभा भंग करण्याची केली शिफारस
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2024 02:45 PM2024-06-05T14:45:16+5:302024-06-05T14:51:46+5:30
Lok Sabha Election Result 2024: आज होणाऱ्या एनडीएमधील घटक पक्षांच्या बैठकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी राष्ट्रपती भवन येथे जात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू याची भेट घेत त्यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे. तसेच जुनी लोकसभा भंग करण्याची शिफारस केली आहे.
लोकसभा निवडणुकीचे निकाल स्पष्ट झाल्यानंतर आता नवे सरकार स्थापन करण्यासाठीचा हालचाली सुरू झाल्या आहे. त्यासाठी आज संध्याकाळी एनडीएच्या घटक पक्षांची बैठक दिल्लीमध्ये होत आहे. या बैठकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती भवन येथे जात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू याची भेट घेत त्यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे. तसेच जुनी लोकसभा भंग करण्याची शिफारस केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला पदाचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वीकारला असून, नव्या सरकारची स्थापना होईपर्यंत त्यांना आणि त्यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाला कामकाज पाहण्याची सूचना राष्ट्रपतींनी दिली आहे. दरम्यान, पंतप्रधान आज होणाऱ्या एनडीएच्या बैठकीत नरेंद्र मोदी हे आपल्या राजीनाम्याची माहिती देतील. त्यानंतर एनडीएचा नवा नेता निवडण्याची प्रक्रिया सुरू होईल.
काल लागलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांमधून दहा वर्षांपासून देशात सत्ता असलेल्या भाजपाला मोठा धक्का बसला होता. दोन वेळा बहुमतासह सत्ता स्थापन करणाऱ्या भाजपाला यावेळी बहुमताने हुलकावणी दिली. मागच्या वेळी ३०३ जागा जिंकणाऱ्या भाजपाला यावेळी २४० जागा मिळाल्या आहे. मात्र भाजपाच्या नेतृत्वाखील एनडीएला २९४ जागा मिळाल्या आहेत. मात्र भाजपाकडे स्वत:चं बहुमत नसल्याने भाजपासमोर सत्तास्थापनेसाठी अडचणी अडचणी येतील, अशी शक्यता निर्माण झाली आहे.
Prime Minister Narendra Modi called on President Droupadi Murmu at Rashtrapati Bhavan. The Prime Minister tendered his resignation along with the Union Council of Ministers. The President accepted the resignation and requested the Prime Minister and the Union Council of Ministers… pic.twitter.com/SHIj1UMWpY
— ANI (@ANI) June 5, 2024
दरम्यान, दिल्लीमध्ये सत्तास्थापनेसाठी हालचाली होत असतानाच नव्या सरकारच्या शपथविधीची तारीख आणि वेळही निश्चित करण्यात आली आहे. ८ जून रोजी संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा होऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेताच नरेंद्र मोदींच्या नावावर एक नवा विक्रम होणार आहे. सलग तिसऱ्यांदा निवडणूक जिंकून देशाचे पंतप्रधान होणारे ते देशातील दुसरे नेते बनतील.