दारुण पराभवानंतर महायुतीत वादाचे फटाके, बारामतीत शिंदे गट, भाजपाची मतं ट्रान्सफर झाली नसल्याचा अजित पवार गटाचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2024 09:43 AM2024-06-05T09:43:03+5:302024-06-05T10:25:32+5:30

Maharashtra Lok Sabha Election Result 2024: लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभानंतर महाराष्ट्रातील महायुतीमधील (Mahayuti) घटक पक्षांमधून आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. याची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (NCP Ajit Pawar) गटाकडून झाली असून, बारामतीत सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या झालेल्या पराभवानंतर अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी भाजपा (BJP) आणि शिंदे गटावर (Shiv Sena Shide Group) आरोप केला आहे.

Lok Sabha Election Result 2024: NCP Ajit Pawar group alleges that there was no Vote transfer of BJP's votes & Shiv Sena Shinde Group in Baramati | दारुण पराभवानंतर महायुतीत वादाचे फटाके, बारामतीत शिंदे गट, भाजपाची मतं ट्रान्सफर झाली नसल्याचा अजित पवार गटाचा आरोप

दारुण पराभवानंतर महायुतीत वादाचे फटाके, बारामतीत शिंदे गट, भाजपाची मतं ट्रान्सफर झाली नसल्याचा अजित पवार गटाचा आरोप

काल लागलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये देशपातळीवर भाजपाला मोठा धक्का बसला आहे. तर महाराष्ट्रात सत्ताधारी महायुतीचा दारुण पराभव झाला आहे. या पराभानंतर महाराष्ट्रातील महायुतीमधील घटक पक्षांमधून आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. याची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून झाली असून, बारामतीत सुनेत्रा पवार यांच्या झालेल्या पराभवानंतर अमोल मिटकरी यांनी भाजपा आणि शिंदे गटावर आरोप केला आहे. बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांना केवळ अजितदादांची मतं मिळाली. मात्र त्यांना भाजपा आणि शिंदे गटाची मतं ट्रान्सफर झाली नाहीत, असा दावा मिटकरी यांनी केला आहे.

अमोल मिटकरी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अजित पवार गटाच्या झालेल्या पराभवाबाबत म्हणाले की, असे निकाल लागतील अशी अपेक्षा आम्हाला नव्हती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्हाला फार कमी वेळ भेटला. कमी वेळामध्ये आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. पण जो कौल जनतेने दिला आहे, तो आम्ही विनम्रपणे मान्य करतो.

दरम्यान, शिंदे आणि भाजपाची मतं हवी तशी ट्रान्सफर न झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची केवळ एकच जागा निवडून आली का, असं विचारलं असता अमोल मिटकरी म्हणाले की, साहजिक आहे आम्हाला तसं वाटायला, शंकेला वाव आहे. आमचे चार उमेदवार रिंगणात होते. नाशिकची जागा भेटली असती तर छगन भुजबळ तिथून लढून निवडून आले असते, अशी आम्हाला अपेक्षा होती. परभणीची राजेश विटेकर यांची जागा सक्षमपणे आली असती. गडचिरोलीमध्ये धर्मरावबाबा यांची जागा आली असती. तसेच धाराशिवच्या जागेवरही वेळेवर तिकीट मिळालं नाही, हे सगळं समिकरण पाहिलं तर असं लक्षात येतं की, एकंदरीत महाराष्ट्रामध्ये महायुतीमधील पक्षांना राष्ट्रवादी काँग्रेसला फायदा झाला आहे. मात्र त्या दोघांचा फायदा व्हायचाच असता तर बारामतीमध्ये आमचा पराभव झाला नसता, असा दावा मिटकरी यांनी केला. 

यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाचंही कौतुक केलं. काल लागलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांमुळे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाला फार मोठी झळाली लाभली आहे. कारण मुख्यमंत्रिपदावरून पायउतार झाल्यानंतर, सगळे सोडून गेल्यानंतर राखेतून जसं विश्व उभं करता येतं. हे त्यांनी दाखवून दिलं. त्यामुळे त्यांचं नेतृत्व हे मान्य करावंच लागेल, असे अमोल मिटकरी यांनी सांगितले. 

Web Title: Lok Sabha Election Result 2024: NCP Ajit Pawar group alleges that there was no Vote transfer of BJP's votes & Shiv Sena Shinde Group in Baramati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.