Lok Sabha Election Result 2024 : "...अन् आम्हाला आत्मविश्वास मिळाला", म्हस्केंनी विजयानंतर सांगितलं 'राज'कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2024 08:43 PM2024-06-04T20:43:34+5:302024-06-04T20:47:52+5:30
Thane Lok sabha Election Result 2024 : ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले.
Lok sabha Election Result 2024 : ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले. ठाण्यातून नरेश म्हस्के यांना एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवारी दिली होती. तर कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे निवडणुकीला उभे होते. हे दोन्हीही उमेदवार प्रचंड फरकाने विजयी झाले आहेत. या दोन्ही उमेदवारांच्या प्रचारासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सभा घेतली होती. विजयानंतर नरेश म्हस्के यांनी प्रतिक्रिया देताना राज ठाकरेंचे आभार मानले.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर पोस्ट करत नरेश म्हस्केंनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, कृतज्ञ... अतिसामान्य घरातून आलेला एक कार्यकर्ता आज ठाण्याचा लोकप्रतिनिधी झाला. मी विद्यार्थीदशेत असल्यापासून ज्या संघटनेला वाहून घेतलं. त्या माझ्या चार अक्षरी जगाला, शिवसेनेला पहिला मानाचा मुजरा करतो. वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आशीर्वादाशिवाय ही लढाई लढणं शक्य नव्हतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला ही संधी मिळाली. आदरणीय राज साहेब ठाकरे यांनी आमच्यासाठी सभा घेतली तेव्हाच आम्हाला खूप आत्मविश्वास मिळाला.
कृतज्ञ....
— Naresh Mhaske (@nareshmhaske) June 4, 2024
अतिसामान्य घरातून आलेला एक कार्यकर्ता आज ठाण्याचा लोकप्रतिनधी झाला....
मी विद्यार्थीदशेत असल्यापासून ज्या संघटनेला वाहून घेतलं...त्या माझ्या चार अक्षरी जगाला, शिवसेनेला पहिला मानाचा मुजरा करतो...वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या… pic.twitter.com/vc5ZC8Akfn
तसेच आमचे सर्वपक्षीय मित्र- कार्यकर्ते, माझे शिवसेनेतील पदाधिकारी, कार्यकर्ते, तमाम शिवसैनिक यांच्या एकत्रित मेहनतीचं हे फळ आहे असं मला वाटतं. सगळ्यात महत्वाचे आहेत माझे ठाणे लोकसभेतील मतदार ज्यांनी मतरूपाने त्यांचे आशीर्वाद मला भरभरून दिले आणि त्यामुळेच आजचा हा विजय शक्य झाला. आभार मानून मी या प्रेमातून उतराई होण्याचा प्रयत्न करणार नाही. मी सदैव तुमचा आहे, तुमच्यासाठी आहे. आतापर्यंत महापालिकेतील तुमची कामं करण्यासाठी मी कटिबद्ध होतो, आता संसदेत कायम तुमच्यासाठी असणार आहे. स्नेह आहेच, ते वृद्धिंगत होवो हे आई भवानीच्या चरणी प्रार्थना, अशा शब्दांत म्हस्केंनी सर्वांचे आभार मानले.