“आशिष शेलारजी संन्यासाची तारीख कधी जाहीर करताय तेवढे सांगा”; सुषमा अंधारेंचा खोचक टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2024 09:09 PM2024-06-04T21:09:39+5:302024-06-04T21:10:27+5:30
Lok Sabha Election Result 2024 Sushma Andhare News: आशिष शेलार यांच्या एका विधानाचा आधार घेत सुषमा अंधारे यांनी खोचक टोला लगावला.
Lok Sabha Election Result 2024 Sushma Andhare News: लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीने जोरदार मुसंडी मारत एनडीएला कमी जागांवर रोखण्यात यश मिळवले आहे. आताच्या घडीला २९३ जागांवर एनडीए आघाडीवर असून, अनेक जागांवर एनडीएचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर इंडिया आघाडी २३२ जागांवर पुढे असून, अनेक जागांवर इंडिया आघाडीचे उमदेवार विजयी झाले आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडीला ३० जागांवर विजय मिळाला असून, महायुतीला १७ जागा मिळाल्या आहेत. भाजपा नेते आणि आमदार आशिष शेलार यांच्या विधानाचा आधार घेत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी खोचक टोला लगावला आहे.
लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू असताना, भाजपाने देशात ४५ पेक्षा अधिक जागा जिंकल्यास तुम्ही राजकारण सोडाल, हा मर्दाचा शब्द द्या. मविआने राज्यात १८ हून अधिक जागा जिंकल्यास मी राजकारण सोडेन, असे थेट आव्हान मुंबई भाजप अध्यक्ष आमदार ॲड आशिष शेलार यांनी दिले होते. राज्यात आघाडी ४८ जागा जिंकेल तर भाजप देशात ४५ जागा तरी जिंकेल का, असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला होता. याला आशिष शेलार यांनी उत्तर देताना एक आव्हान दिले होते. लोकसभा निवडणुकीचा निकाल आल्यानंतर सुषमा अंधारे यांनी खोचक शब्दांत टीका केली आहे.
आशिष शेलारजी संन्यासाची तारीख कधी जाहीर करताय तेवढे सांगा
सोशल मीडियावरील एक्सवर पोस्ट करताना सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे की, आशिष शेलारजी संन्यासाची तारीख कधी जाहीर करताय तेवढे सांगा ना… म्हणजे तुमच्या संन्यास सोहळ्याला मला तुम्हाला भगवी कफनी, रुद्राक्षाच्या माळा, काठी, लोटी, सगळे देता येईल, असा खोचक टोला सुषमा अंधारे यांनी लगावला.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या अतिमहत्त्वकांक्षेमुळे भाजपा आणि महायुतीला फटका बसला आहे. देवेंद्र फडणवीस पुन्हा कधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार नाहीत, ते येतील पण विरोधी बाकावर बसतील. राज्यभर फिरले, राहुल गांधींच्या यात्रेचा परिणाम दिसत आहे. उत्तर प्रदेशातील जागा पाहून आश्चर्य वाटते. हे सर्व चित्र आशादायी आहे, अशी टीकाही सुषमा अंधारे यांनी केली.