"…म्हणून इंडिया आघाडीने सरकार स्थापनेसाठी दावा केलाच पाहिजे’’, उद्धव ठाकरे यांनी सांगितलं महत्त्वाचं कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2024 09:05 PM2024-06-04T21:05:21+5:302024-06-04T21:06:22+5:30
Lok Sabha Election Result 2024:
लोकसभा निवडणुकीच्या निकालांमधून भाजपाचं बहुमत हुकल्यानंतर आता इंडिया आघाडीला सत्ता स्थापन करण्याची आशा दिसू लागली आहे. एकीकडे भाजपाचं बहुमत हुकलं असलं तरी भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएला बहुमताहून अधिकच्या जागा मिळाल्या आहेत. मात्र एनडीएमधील नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांसारखे नेते आपली भूमिका बदलू शकतात, असा दावा केला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी मोठं आणि सूचक विधान केलं आहे. इंडिया आघाडीने सत्तास्थापनेसाठी दावा केलाच पाहिजे, असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की, इंडिया आघाडीची बैठक होण्याआधी निर्णय काय सांगणार. पण इंडिया आघाडीने सत्तास्थापनेसाठी दावा केलाच पाहिजे. इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी मी उद्या दुपारनंतर दिल्लीला जाईन. कारण आमचे जिंकलेले मुंबई बाहेरचे उमेदवार उद्या मुंबईत भेटायला येतील. त्यामुळे इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी सुरुवातीला संजय राऊत आणि मुंबईतील खासदार अनिल देसाई आणि अरविंद सावंत हे पुढे जातील. तर दुपारनंतर संध्याकाळच्या वेळी मी दिल्लीला पोहोचेन, अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली.
ते पुढे म्हणाले की, सरकार स्थापन करणं आणि पंतप्रधानपदाचा चेहरा याबाबत उद्या इंडिया आघाडीची बैठक होणार आहे. तसेच एक गोष्ट मी पहिल्यापासून सांगत आहे की, यावेळेला आमच्यापैकी कुणीही आपण पंतप्रधानपदाबाबत इच्छूक आहे, या मताचा नाही. देशाची लोकशाही वाचवली पाहिजे. देशाचं संविधान वाचवलं पाहिजे. तसेच हुकूमशाहीपासून देशाला वाचवलं पाहिजे, ही आमची एकत्र येण्यामागची भावना होती. ही भावना आजही कायम आहे. उद्या सर्वांच्या मताने इंडिया आघाडीचा पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरवला जाईल. तसेच आम्ही सर्व सोबत राहणार आहोत, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
एनडीएचं बहुमत आहे, असं दाखवलं जातंय, पण पण बिहारसारख्या राज्यांमध्ये मतमोजणी उशिरा सुरू झाली. त्याचे निकाल पूर्ण समोर यायचे आहेत. तसेच आणखी काही छोटे पक्ष आहेत. त्यांच्याशी संपर्क सुरू आहे. एकूणच काय या जुलूम जबरदस्तीला जे लोक कंटाळले आहेत. जिंकलेले पक्ष आहेत, अपक्ष आहेत. ते इंडिया आघाडीमध्ये एकवटतील आणि पुन्हा एकदा जुलूम जबरदस्तीचं सरकार येऊ देणार नाहीत, याची खात्री आहे. तसेच नितीश कुमार आणि चंद्राबाबू यांच्याशीही काँग्रेस आणि इतर पक्षांकडून बोलणी सुरू आहे. चंद्राबाबू नायडू यांनाही भाजपाने काही कमी त्रास दिलेला नाही. नितीश कुमार यांनाही काही कमी त्रास दिलेला नाही. पुन्हा त्रास हवा का हा प्रश्न आहे. एकदा हे गेलेलं सरकार उंबरठ्यावर आहे ते बाहेर काढण्यासाठी सगळे पक्ष एकवटतील, याची मला खात्री आहे, असा विश्वासही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.