लोकसभा निवडणूक निकाल 2019: मनसेवर शरद पवारांचे मोठं विधान, राज ठाकरेंबाबत पवार अजूनही आशावादी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2019 03:50 PM2019-05-23T15:50:45+5:302019-05-23T15:51:37+5:30
लोकसभा निवडणुकीच्या निकालांचे जवळपास चित्र स्पष्ट झालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने बारामती, शिरुर, सातारा, रायगड हे मतदारसंघ ताब्यात मिळविले आहेत.
पुणे - लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सर्वात चर्चेत राहिलेला मनसेचा निकालांवर जास्त परिणाम झाला नसल्याचं जवळपास स्पष्ट झाला आहे. मनसेने सभा घेतलेल्या ठिकाणी आघाडीला मतांचा फायदा झाल्याचं दिसून येत नाही. मात्र मनसेने निवडणुकीत उमेदवार उभे केले असते तर चित्र वेगळं असतं असं शरद पवारांनी मनसेवर विश्वास दाखविला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या निकालांवर भाष्य करण्यासाठी शरद पवारांनी पत्रकार परिषद घेतली. राज ठाकरे यांच्या सभांचा किती फायदा झाला यावर बोलताना शरद पवारांनी यावर बोलणं टाळलं मात्र मनसेने उमेदवार उभे केले नव्हते, जर त्यांनी लोकसभेत उमेदवार उभे केले असते तर बहुदा चित्र वेगळं दिसलं असतं असा अंदाज पवारांनी दिला.
तसेच महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये संपर्क ठेऊन जनाधार वाढविण्यासाठी माझ्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते प्रयत्न करतील. रायगड, बारामती, शिरुर, सातारा या चार मतदारसंघात राष्ट्रवादी विजयी झालेली आहेत. अमरावती आणि माढ्यात अटीतटीची लढत आहे त्याचं चित्र स्पष्ट होईल असा विश्वास पवारांनी व्यक्त केला.
दरम्यान मावळ लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीने कधी जिंकला नव्हता. तिथे पक्ष वाढविण्याच्या दृष्टीने आम्हाला जे करायचं होतं ते आम्ही करु शकलो असं भाष्य पार्थ पवार यांच्या पराभवावर शरद पवारांनी दिली. तसेच मी निवडणूक लढवणार नव्हतो हे 2014 साली ठरवलं होतं. मी राज्यसभेचा सदस्य होतो. माढ्यातील पक्षातील पदाधिकाऱ्यांमध्ये एकवाक्यता नव्हती म्हणून मी तुमच्यात एकवाक्यता नसेल तर मी लढतो असं बोललो होतो असं पवारांनी स्पष्ट केलं.
अपेक्षित निकाल नाही, पण लोकांचा कौल मान्य - शरद पवार @PawarSpeaks@NCPspeaks https://t.co/8fhkJLZJdl
— Lokmat (@MiLOKMAT) May 23, 2019
लोकसभा निवडणुकीच्या निकालांचे जवळपास चित्र स्पष्ट झालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने बारामती, शिरुर, सातारा, रायगड हे मतदारसंघ ताब्यात मिळविले आहेत. अजूनही काही मतदारसंघात मतमोजणी सुरु आहे. त्याठिकाणीही काही जागांवर विजय मिळू शकतो अशी शक्यता शरद पवारांनी व्यक्त केली आहे.