...तर वंचित बहुजन आघाडी स्थापनेची गरजच पडली नसती; प्रकाश आंबेडकरांचा मोठा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2024 07:07 PM2024-06-08T19:07:23+5:302024-06-08T19:08:05+5:30

loksabha Election Result - लोकसभा निवडणुकीच्या निकालात महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीला अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही. या निकालाचं विश्लेषण करत प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीवर गंभीर आरोप केले आहेत. 

Lok Sabha Election Results - All India Alliance parties used Bahujan votes only to save themselves - Vanchit Bahujan Aghadi leader Prakash Ambedkar | ...तर वंचित बहुजन आघाडी स्थापनेची गरजच पडली नसती; प्रकाश आंबेडकरांचा मोठा गौप्यस्फोट

...तर वंचित बहुजन आघाडी स्थापनेची गरजच पडली नसती; प्रकाश आंबेडकरांचा मोठा गौप्यस्फोट

मुंबई - Prakash Ambedkar on Loksabha Result ( Marathi News ) INDIA आघाडीतील पक्षांचा ढासळणारा वाडा वाचवण्यासाठी आणि पुन्हा नव्याने उभारण्यासाठी बहुजन मतदारांच्या स्वतंत्र नेतृत्वाचा स्वतःचा बालेकिल्ला पाडायला भाग पाडण्यात आले. या पक्षांना संविधान वाचवायचे असते, सामाजिक दृष्ट्या वंचित व शोषितांसाठी लढायचे असते, तर वंचित बहुजन आघाडी स्थापन करण्याची गरजच पडली नसती. INDIA आघाडीतील पक्षांनी दलित, आदिवासी, ओबीसी, मुस्लीम यांची मते घेतली आहेत. पण, त्यांच्याकडून घेतलेल्या पाठिंब्याला ते न्याय देतील की नाही, हा येणारा काळच सांगेल असं विधान वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. 

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, वंचित बहुजन आघाडीनेच आंबेडकरी चळवळ आणि संविधान वाचवण्याच्या लढ्याचे नेतृत्व केले होते. जेव्हा या प्रमुख पक्षांचे सदस्य सॉफ्ट हिंदुत्वात गुंतले होते आणि एनडीए 1 आणि 2 च्या सरकारच्या काळात राज्यघटनेत करण्यात येत असलेल्या सुधारणांवर मौन बाळगून होते. भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएसोबत लढण्याचा अजेंडा नसल्याचे INDIA आघाडीच्या लक्षात आल्यावर त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वापर केला. 'संविधान वाचविण्याचा लढा' आमच्या तत्त्वज्ञानातून आणि मोहिमेतून त्यांनी घेतला. INDIA आघाडीने दलित, आदिवासी, ओबीसी आणि मुस्लिम हे भाजपशी लढण्यास सक्षम विरोधक असल्याचे मतदारांना पटवून दिले. मात्र, प्रत्यक्षात या राजकीय पक्षांना केवळ स्वतःला वाचवायचे होते आणि यासाठी त्यांनी बहुजनांच्या मतांचा वापर केला असा आरोप त्यांनी केला. 

तसेच मतदारांबद्दल आमची कोणतीही तक्रार नाही. त्यांना सांगितले गेले की, फक्त आणि फक्त INDIA आघाडीला मतदान केल्यास भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएपासून देश वाचवू शकतो. परंतु, तरीही एनडीए बहुमत मिळवण्यात यशस्वी झाला. भेदभाव करणाऱ्या वैदिक धर्माविरुद्ध आणि सामाजिकदृष्ट्या वंचित आणि शोषितांसाठी आम्ही सुरू केलेला लढा या निवडणुकीने अधोरेखित केला आहे आणि आम्हाला त्याचा अभिमान वाटतो. कारण, येत्या ५० वर्षांपर्यंत भाजप वैदिकवाद आणण्याचा उच्चार करणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. हा वंचितांनी उभारलेल्या मोठ्या लढ्याचा परिणाम आहे, सहभाग आहे. त्यामुळे कोणीही संविधान बदलण्याचे धाडस केल्यास वंचित आणि शोषितांच्या प्रतिनिधींना आणि समर्थकांना त्याविरोधात उभे राहण्याची अधिक संधी मिळेल असंही प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं. 

दरम्यान, आम्ही जनतेचा जनादेश नम्रपणे स्वीकारला आहे. आम्ही निराश झालो आहोत पण, आशा सोडलेली नाही. आम्ही आत्मपरीक्षण करून वंचित बहुजन आघाडीच्या रणनीतीतील त्रुटी तपासून आवश्यक त्या उपाययोजना जरूर करू. मतदारांबद्दल आमची कोणतीही तक्रार नाही. वंचित बहुजन आघाडीचा मूळ पायाच फुले-शाहू-आंबेडकर असून, "जय फुले, जय सावित्री, जय शाहू, जय भीम" यांच्याकडूनच आम्हाला ताकद मिळते. आमची बांधिलकी निरपेक्ष आहे. सामाजिकदृष्ट्या वंचित आणि शोषितांची बाजू मांडणे आणि त्यांच्या राजकीय प्रतिनिधित्व आणि हक्कांसाठी लढणे हेच आमचे ध्येय आहे. आम्ही आमच्या अपयशाचे आत्मपरीक्षण करू असंही प्रकाश आंबेडकरांनी सांगितले. 

महाविकास आघाडीनं केला अपमान

महाविकास आघाडीतील काही घटकांनी जाणीवपूर्वक वंचित बहुजन आघाडीला आघाडीत सामावून घेतले नाही. आम्हाला बैठकांसाठी आमंत्रित करण्यात आले होते. परंतु, ते सर्व मीडिया आणि मतदारांसाठी होते. आम्ही त्यांच्या जाळ्यात अडकलो आणि मतदारांना आमचा झालेला अपमान आणि आमच्या पक्षाप्रती महाविकास आघाडीची संकुचित वृत्ती पटवून देण्यात सपशेल अपयशी ठरलो अशी खंतही प्रकाश आंबेडकरांनी मांडली. 

त्याशिवाय महाविकास आघाडीच्या शेवटच्या बैठकीत महाविकास आघाडीने २ जागा वंचित बहुजन आघाडीला देत असल्याचे सांगितले. त्यातील एक जागा अकोला आणि दुसरी जागा उत्तर मुंबई होती. महाविकास आघाडीचे नेते माध्यमाशी बोलताना या जागांचा आकडा ४ ते ६ सांगायचे आणि ते ज्या जागांचा उल्लेख करायचे त्यात आम्हाला २०१९ मधे एक लाखाच्या वर मतदान मिळालेली एकही जागा नसायची. यावरून लक्षात आलेली गोष्ट म्हणजे उत्तर मुंबईची न जिंकता येणारी जागा होती, तर अकोल्याच्या जागेत कधीही गेम होऊ शकतो. इंडिया आघाडी बरोबर जाऊन पडणे आणि स्वतःच्या ताकदीवर लढणे यात फरक आहे. स्वतःच्या ताकदीवर लढून टिकण्याचा मार्ग कायम राहतो आणि म्हणून आम्ही टिकण्याचा मार्ग स्वीकारला.महाविकास आघाडीने एवढे अपमानित करुनही आम्ही सहभागी होण्यासाठी पुरेपुर प्रयत्न केला. यासाठीचे पहिले पाऊलही वंचित बहुजन आघाडीनेच टाकले. जे गेले अनेक महिने दुर्लक्षित केले गेले. महाविकास आघाडीने काही ठराविक बैठकींना आम्हाला बोलावले. बाकीच्या बैठकांना बोलावले नाही असा आरोपही प्रकाश आंबेडकरांनी केला. 

पुन्हा ताकदीनं उभं राहू 

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला थोडा वेळ आहे. येत्या काही महिन्यांत मतदारांशी अधिक मजबूत नाते निर्माण करण्यासाठी आम्ही त्यांच्यासोबत अधिक संवाद करू.आमच्यावर विश्वास दाखवणाऱ्या मतदार, समर्थक, हितचिंतकांना एकत्र घेऊन पुन्हा मोठ्या ताकदीने पुनरागमन करू. तसेच, सामाजिक दुष्प्रवृत्तींविरुद्ध आणि सामाजिक दृष्ट्या वंचित आणि शोषितांच्या स्वतंत्र राजकीय नेतृत्वासाठी आम्ही लढत राहू असा विश्वास प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केला. 
 

Web Title: Lok Sabha Election Results - All India Alliance parties used Bahujan votes only to save themselves - Vanchit Bahujan Aghadi leader Prakash Ambedkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.